नुकतेच राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. एव्हाना अॅडमिशन आणि पुढील शिक्षणासाठीची पालकांची लगबगही सुरु झालेली. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी, पालकांची भूमिका, अभ्यासक्रमाची भूमिका यांसारख्या मुद्द्यांच्या अनुषंगाने शैक्षणिक मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख...
सर्वसामान्यपणे पाहिल्यास शिक्षण हा एक सांघिक प्रयत्न आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि आजूबाजूचे वातावरण हे सर्व या संघाचे सदस्य आहेत. जर एक सदस्य या सांघिक प्रयत्नात सहभागी झाला नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नक्कीच नुकसान होईल. लहान मुले किती शिक्षण-केंद्रित किंवा शिक्षणाभिमुख आहेत, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भिन्नता दिसून येते. काही शिक्षक आणि शाळा शैक्षणिक कामगिरीवर जास्त लक्ष केंद्रित करतात, तर इतर तसे करीत नाहीत. आपल्या मुलाला कुठल्या शाळेत घालावे, या निवडीवर तुमच्या मुलाच्या शैक्षणिक ‘फोकस’चे महत्त्व कमी लेखू नका.
त्यांच्यासाठी योग्य असलेल्या शाळेचा मुलांच्या विकासावर खूप प्रभाव पडू शकतो. कारण, शाळा एक-आदर्श आकाराची असते, असे समजले जाते. सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच फूटपट्टी वापरते. परंतु, लोक एक-आकाराचे शिकणारे नाहीत. लोक वेगवेगळ्या प्रकारे शिकतात. काही पाठांतर करत आहेत. काही विश्लेषण करणे पसंत करतात. काहींना अनेक विषयांच्या पृष्ठभागावर समजून घ्यायला आवडते. काहींना एका वेळी एकाच विषयात खोलवर पोहायला जावे लागते. काही लोक चळवळीतून उत्तम शिकतात. काही प्रयोगातून शिकतात. सर्वांच्या आवडीनिवडी भिन्न आहेत. स्वारस्य हे आपल्यापैकी प्रत्येकाला ज्ञान खेचण्यास कारणीभूत ठरते.
वाटायला विचित्र वाटेल, तरी पण माझ्या लक्षात आले आहे की, अभ्यासात चांगले असणेदेखील पारंपरिक वारशाने मिळते. उदाहरणार्थ, तुमचे पालक चांगले शिकलेले असतील, तर मूलदेखील अभ्यासात चांगले असेल आणि ते त्यांच्या पालकांपेक्षा थोडे जास्तच अभ्यास करेल. कोणत्याही मुलाचे पालक नीट शिकलेले नसतील, तर उत्तम संधी देऊनही अनेक मुलांच्या अभ्यासात अनेक अडचणी आलेल्या दिसून येतात.
संशोधनात आणि वर्तणूकशास्त्रात शिक्षकांनी, पालकांच्या फक्त गृहपाठ ‘हँडहोल्डर’ म्हणून नाही तर, त्यांच्या मुलांच्या अभ्यासातील कृतिशील सहभागाच्या महत्त्वावर जोर दिला आहे. मुलाचे चारित्र्य, आत्मविश्वास, प्रेरणा आणि शालेय कामासाठी वैयक्तिक जबाबदारीच्या विकासामध्ये पालक हे प्रमुख खेळाडू असतात. या सर्व गोष्टी मुलाच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक कल्याणासाठी योगदान देतात. आजकाल कोणीही सोम्यागोम्या शिक्षण संस्थेवर टीका करताना दिसत असतो. परंतु, आपली शिक्षण व्यवस्था ही बहुसंख्याकांसाठी आणि बहुसंख्याकांना लाभ देणारी व्यवस्था आहे. आपल्यापैकी बहुतेक सामान्य शालेय वातावरणात उत्तीर्ण होण्यासाठी समजून-उमजून पुरेशी कामगिरी करतील किंवा काही अगदी उत्कृष्ट कामगिरीसुद्धा करतील. परंतु, अशी काही मुले असतींल, जे खूप संघर्ष करूनसुद्धा काटेकोर चौकटीबद्ध शिक्षण प्रणालीमुळे बहुधा बाहेर पडतील.
माणसं गतिमान आहेत. शिकताना आपण एक किंवा दोन आयामी नसतो. आपल्यापैकी प्रत्येकाला शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी वेगवेगळ्या संसाधनांची आवश्यकता असते. आपली शिकण्याची क्षमता आपल्या प्रत्येकासाठी आपल्या हाताच्या बोटांसारखीच अद्वितीय आहे. भारतीय शालेय व्यवस्थेतील प्राथमिक अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे पाठांतर करणे आणि स्मरण करणे. शिक्षण हे बहुतांशी पाठ्यपुस्तकांवर आधारित असते. अनुभवात्मक अध्यापन-अध्ययन क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, परीक्षेपूर्वी निर्धारित अभ्यासक्रम घोकून करण्यासाठी सगळेच व्यस्त आहेत आणि शिक्षक वेळेवर अभ्यास पूर्ण करण्याकडे अधिक आतुर आहेत.
परीक्षा सामान्यत: विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती टिकवून ठेवण्याची आणि अभ्यासाचे कालबद्ध पुनरुत्पादन करण्याच्या क्षमतेच्या चाचण्या म्हणून कार्य करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे मूल्यांकन म्हणून न करता, परीक्षा-केंद्रित पद्धतीने अभ्यास करण्यास प्रोत्साहित केले जाते. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा संदर्भ देऊन आणि त्यांना सर्वोत्तम गुण मिळतील, अशी आदर्श उत्तरे तयार करण्यात शाळा वा कोचिंग क्लास व्यस्त दिसतात. शाळेमध्ये जे काही शिकवले जाते, त्याची उजळणी व पुनरावृत्ती करण्यात दिवसातून अनेक तास विद्यार्थ्यांना घालवणे आवश्यक आहे. परीक्षा जवळ आल्याने, विद्यार्थी काही धड्यांची मोठ्या प्रमाणात उजळणी करण्यात अधिक वेळ घालवतात. भारतीय शालेय विद्यार्थ्यांचा एक सामान्य आठवड्याचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो आणि बहुतेकदा तो संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत पोहोचतो.
कारण, त्यांच्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी त्यांच्याशाळेची वेळ झाल्यावर ‘ट्यूशन क्लासेस’ (नियमित शाळेच्या पलीकडे खासगी शिकवणी) आणि कोचिंग क्लासेस (महाविद्यालयीन प्रवेश परीक्षांसाठी तयारीचे वर्ग) मध्ये उपस्थित असतात. वरच्या इयत्तांमध्ये शैक्षणिक दबाव वाढत असला तरी, शिकणे, गृहपाठ आणि तयारीची योजना खालच्या श्रेणींमध्ये मोठ्या प्रमाणात सारखीच राहते. कारण, काही मुले काही विशिष्ट विषयांचा अभ्यास करतात आणि इतर विषयांचा तेवढ्या प्रमाणात अभ्यास करीत नाहीत. एखाद्या मुलाला गणिताची आवड असू शकते. परंतु, इंग्रजी किंवा परदेशी भाषेत ते खराब कामगिरी करू शकतात. त्यांनी चांगला अभ्यास करण्यासाठी प्रेरित असले पाहिजे. काहींचे बुद्ध्यांक उच्च आहेत आणि ते सर्व काही सहज चुटकीसारखे शिकतात.
काहींचा बुद्ध्यांक कमी असतो, परंतु ते अधिक प्रयत्न करुन प्रत्यक्षात नैसर्गिकरित्या मिळालेल्या बुद्धीपेक्षा अधिक साध्य करतात. जर एखाद्या पालकाला त्यांच्या मुलामध्ये एखाद्या विशिष्ट विषयात अप्रतिम प्रतिभा, कौशल्ये किंवा स्वारस्य असल्याचे दिसून आले, तर त्या पालकांनी त्यांच्या मुलाच्या बौद्धिक कुतूहलाला चालना देण्यासाठी आणि त्यांना जे आवडते, त्या विषयावर प्रभुत्व मिळविण्यात मदत करण्यासाठी सर्व काही केले पाहिजे. मुले किती हुशार असतात, याचे एक प्रकारे मोजमाप करता येत नाही, हे मात्र खरे.
संशोधन सांगते की, शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली ही विद्यार्थ्यांची एखाद्या विषयातील आणि एकंदरीत अभ्यासातील व्यस्तता आहे. याचा अर्थ असा की, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थिती किंवा इतर सामाजिक घटकांचा विचार न करता, अभ्यासात व्यस्त आणि गर्क असलेले विद्यार्थी हे स्वारस्य नसलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा शाळेत उत्तम शैक्षणिक यश मिळवितात आणि हो, त्यांचे पालकदेखील त्यांच्याइतकेच त्यांच्या अभ्यासात व्यस्त दिसून येतात!
परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झाली आहे तर थोडासा गंभीर विचार विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून... (क्रमशः)
डॉ. शुभांगी पारकर