दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत ५ पाकिस्तानी सैनिक ठार

27 May 2024 18:44:16
 pakistan army
 
इस्लामाबाद : पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर इस्लामिक दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची कबुली खुद्द पाकिस्तानी लष्करानी दिली आहे. रविवार, दि. २६ मे २०२४ ला झालेल्या गोळीबारानंतर आज (२७ मे २०२४) पुन्हा पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
 
या चकमकीत पाच पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी लष्कराने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने गेल्या दोन दिवसात अफगाण सीमेजवळील वायव्य पाकिस्तानमधील तीन दहशतवादी ठिकाणांवर कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराच्या या कारवाईत २३ दहशतवादी मारल्याचा, दावा पाकिस्तान लष्कराने केला आहे.
 
हे दहशतवादी कोणत्या गटाचे आहेत हे लष्कराने सांगितले नाही. अफगाणिस्तानमध्ये सध्या दहशतवादी संघटना असलेल्या तालिबानचे शासन आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना तालिबान सुरक्षित आश्रय देत असल्यामुळे अतिरेक्यांसाठी हा भाग दीर्घकाळापासून सुरक्षित आश्रयस्थान बनला आहे. अफगाणिस्तानमध्ये राहून हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करतात, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. पण अफगाणिस्तानमधील तालिबानने हे आरोप फेटाळले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0