सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा! गोपीचंद पडळकरांची मागणी

27 May 2024 13:40:08

Gopichand Padalkar 
 
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. या बँकेच्या सहा शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनी २ कोटी ४३ लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
 
गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "गेल्या ५ ते ६ वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात सातत्याने घोटाळे बाहेर येत आहेत. सहकारातून शेतकऱ्यांना मदत व्हायला हवी, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला हवी, त्यांना सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध व्हावं किंवा सरकारची अनुदानं शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहजरित्या मिळावी, अशी अपेक्षा असते. परंतू, सांगली जिल्हा बँकेच्या माध्यमातून सातत्याने अनेक घोटाळे उघड होत आहेत. मी स्वत: याबाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींची बाजी
 
ते पुढे म्हणाले की, "सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळपास २१९ शाखा आहेत. यातील सहा शाखांमधील घोटाळा पुढे आला आहे. बँकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता अधिकारी आणि कर्मचारीही घोटाळा करायला लागले आहेत. त्यामुळे या सर्वांची चौकशी व्हायला हवी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक मंडळ पुर्णपणे कायद्याचा गैरवापर करुन चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप करत आहेत. त्यामुळे बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन इथे प्रशासक नेमण्याची मागणी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. तसेच वर्षानुवर्षे तिथेच काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणीही त्यांनी केली आहे."
 
 
 
Powered By Sangraha 9.0