नवभारताच्या निर्मितीमध्ये विस्तारकांचा खारीचा वाटा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

27 May 2024 17:57:45

Devendra Fadnavis

मुंबई (प्रतिनिधी) : रामभाऊ म्हाळगी (Rambhau Mhalgi) प्रबोधिनी, उत्तन येथे दोन दिवसीय (२५-२६ मे) 'भाजपा महाराष्ट्र विस्तारक समीक्षा वर्गा'चे आयोजन करण्यात आले होते. याच्या समारोप सत्रात रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. नवभारताच्या निर्मितीमध्ये विस्तारकांचा खारीचा वाटा असल्याचे ते यावेळी म्हणाले.

आपले मनोगत व्यक्त करत देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. याच कार्यकर्त्यांना संघटित करून योग्य दिशा देण्याचे काम भाजपा महाराष्ट्र विस्तारक समीक्षा वर्गाने केले आहे. कोणतीही निवडणूक केवळ नेत्यामुळे जिंकता येत नाही, तर जमिनीशी जोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि विस्तारकांची त्यांना सोबत लागते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विस्तारकांनी घेतलेल्या कष्टाबद्दल आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन."

हे वाचलंत का? : भारताला मजबूत करण्यासाठी 'मजबूत सरकार' आवश्यक : स्वामी जितेंद्रानंद सरस्वतीजी महाराज

पुढे ते म्हणाले, "भारताला सर्वाधिक आर्थिक पाठबळ पुरविणारे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. महाराष्ट्राने विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे." येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळणाऱ्या सर्व जागांवर सर्वाधिक मताधिक्य मिळवण्यासाठी आणि मित्र पक्षांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी विस्तारकांना केले आहे.

यावेळी भाजपचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, आमदार श्रीकांत भारतीय, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0