धक्कादायक! आरोपी वेदांतचे ब्लड सँपल डॉक्टरांनी टाकले कचरापेटीत

27 May 2024 11:42:04

Amitesh Kumar
 
पुणे : पुणे अपघात प्रकरणात एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरने अल्पवयीन आरोपी वेदांतचे ब्लड सँपल कचरापेटीत टाकले असून त्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीचे सँपल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.
 
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, "१९ तारखेला सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सँपल घेण्यात आले होते. परंतू, ससून रुग्णालयातील डॉक्टरने आरोपीचे ब्लड सँपल कचरा पेटीत टाकून दिले आणि त्याऐवजी एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सँपल घेऊन त्यावर आरोपीचे नाव लिहून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले. दरम्यान, ससून रुग्णालयातील सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची विचारपूस करण्यात आली. फॉरेन्सिक मेडिकलचे एचओडी डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरून हे कृत्य करण्यात आले आहे," असे त्यांनी सांगितले.
 
तसेच "त्यादिवशी रात्री औंधमधील सरकारी रुग्णालयात डीएनए मँचिंगसाठी अल्पवयीन आरोपीचे दुसरे ब्लड सँपल घेण्यात आले होते. यावेळी आरोपीच्या वडिलांचेही ब्लड सँपल घेतले होते. काल मिळालेल्या रिपोर्टनुसार, औंधमधील सँपल वडिलांसोबत मॅच झाले आहे. परंतू, ससून रुग्णालयातील सँपल मॅच झालेले नाही. त्यामुळे ते तिसऱ्याच व्यक्तीचे सँपल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करुन त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. बदलेले ब्लड सँपल कुणाचे होते हे माहित करण्यासाठी ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून याबाबत तपासणी करण्यात येणार आहे," अशी माहितीही पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0