पुणे अपघातप्रकरणी आणखी एकाला अटक! ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप

25 May 2024 11:55:13

Surendra Agrawal 
 
पुणे : पुण्यातील कल्याणीनगमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप आहे. दरम्यान, याप्रकरणात विशाल अग्रवालवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पुण्यात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालच्या पोर्शे कारने मोठा अपघात घडला. यात दोन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी वेदांत कार चालवत असताना त्यांचा ड्रायव्हर गंगाराम पुजारी हा त्याच्या शेजारी बसला होता. मात्र, अपघात घडल्यानंतर हा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे.
   
 
याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली होती. यासंदर्भात ड्रायव्हरने जबाब नोंदवला आहे. स्वत:वर गुन्हा ओढवून घेण्यासाठी ड्रायव्हरला पैशांचे आमिष देण्यात आले होते. यासाठी त्याच्यावर जबरदस्ती करत त्याला दोन दिवस डांबूनही ठेवण्यात आले होते.
 
"सुरुवातीला ड्रायव्हरने हा गुन्हा स्वत:वर घ्यावा. याबदल्यात त्याला मागेल ती रक्कम देण्यात येईल, असे आमिष देण्यात आले. यापेक्षा वेगळं काही बोलल्यास त्याला धमक्याही देण्यात आल्या. त्यामुळे त्याने घाबरून प्राथमिक जबाबात आपणच गाडी चालवत असल्याचे म्हटले. परंतू, अल्पवयीन आरोपीच गाडी चालवत असल्याचे चौकशीनंतर पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी दिवसभर ड्रायव्हरची विचारपूस केली. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या दरम्यान त्याला पोलिस स्टेशनमधून सोडण्यात आले. त्यावेळी आरोपीने त्याला जबरदस्तीने आपल्या घरी नेले आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तिथे त्याला डांबून ठेवण्यात आले आणि त्याला आमिष दाखवत दबाव टाकण्यात आला. त्यानंतर त्याची पत्नी त्याच्या शोधात आरोपीच्या घरी पोहोचली," अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0