पुणे : पुणे अपघात प्रकरणात दोन पोलीसांना निलंबित करण्यात आले आहे. तपासात योग्य सहकार्य न करणे आणि वरिष्ठांना वेळेत अपघाताची माहिती न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली.
पुण्यात मद्यप्राशन करुन पोर्शे कार चालवत अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालने दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - पुणे अपघातप्रकरणी आणखी एकाला अटक! ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप
दरम्यान, पुणे पोलिसांवर याप्रकरणाच्या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानंतर आता दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ घटनेबद्दल न कळवणे आणि घटनास्थळावरून त्यांना पोलिस स्टेशनला न आणता हॉस्पीटलमध्ये घेऊन जाणे अशा प्रकारचे दुर्लक्ष झाल्यामुळे आणि त्यांनी योग्य काम न केल्यामुळे दोघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.