मुंबई : डोंबिवली दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांचं महाराष्ट्रावर असलेलं प्रेम किती बेगडी आणि नकली आहे ते दिसलंय, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. दुर्घटनेनंतर डोंबिवलीकरांना मदत करण्यासाठी ते कुठेही दिसलेले नाहीत, असेही ते म्हणाले.
नितेश राणे म्हणाले की, "डोंबिवली परिसरात घडलेल्या घटनेनंतर राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री सतत संपर्कात आहेत. यातून कुटुंबप्रमुख कसे असतात याचं उत्तम उदाहरण दाखवून ते देत आहेत. दुसरीकडे, स्वयंघोषित कुटुंबप्रमुख मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून खाली उतरायला तयार नाहीत. तिथे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव यांच्यापैकी कुणीही फिरकलेलं नाही. लोकसभेच्या निवडणूकीच्या निमित्ताने त्यांना डोंबिवलीची फार काळजी लागली होती. तेव्हा त्यांनी मोठमोठी भाषणं केली पण आज डोंबिवलीकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज असताना महायूतीचे नेतेच तिथे उपलब्ध आहेत," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - डोंबिवली स्फोटाच्या घटनेनंतर अंबर कंपनीला एमपीसीबी क्लोजर नोटीस!
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत इतरवेळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन उगाच तोंडातून आग ओकतात. निवडणूकीच्या काळात ते आम्ही म्हणजे महाराष्ट्र असं दाखवायचे. पण आता महाराष्ट्रातील डोंबिवली भागात जनतेला तुमची एवढी गरज असताना हे तिन्ही विदूषक कुठेही दिसत नाहीत. म्हणजे त्यांचं महाराष्ट्रावर किती बेगडी आणि नकली प्रेम आहे, हे यातून दिसत आहे," असेही ते म्हणाले.