मुंबई : ‘टीक-टीक वाजते डोक्यात...’, हे गाणं आजही प्रत्येक प्रेमीयुगुलाच्या तोंडावर पाठ असेल आणि ब्रेकअप झालं असेल तर ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही’ हे गाणं प्लेलिस्टवर नक्कीच असेल. ‘दुनियादारी’ हा चित्रपट खरं तर मैत्रीची व्याख्या आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तम कथानाक,तगडी स्टारकास्ट, भन्नाट गाणी...असा हा ११ वर्षांपूर्वी आलेला मराठी चित्रपट 'दुनियादारी' पुन्हा एकदा थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
अभिनेता अंकुश चौधरी याने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “आनंदाची बातमी, तर वाचकांनो.. 'दुनियादारी' ११ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे’. मुंबई, पुणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, आकुर्डी अशा भागांमधील काही निवडक थिएटरमध्ये 'दुनियादारी' पुन्हा रिलीज झाला असून प्रेक्षकांना मित्रांसोबत हा चित्रपट आता पाहता येणार आहे.
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटातील प्रत्येक पात्र आपल्याला जवळंच वाटतं. यातील प्रत्येक संवादही मित्रांसोबत असताना बोलला जातोच. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, संदीप कुलकर्णी, उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या.