ठाणे : डोंबिवली स्फोटाच्या घटनेनंतर अंबर कंपनीला एमपीसीबीने क्लोजर नोटीस बजावल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवार, २३ मे रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अंबर कंपनीत सलग तीन स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला असून ५० च्या वर नागरिक जखमी झाले आहेत.
दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीतील अंबर कंपनीत भीषण स्फोट प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण प्रादेशिक कार्यालयाने अंबर कंपनीला क्लोजर नोटिस बजावली आहे. कंपनीने उत्पादन प्रक्रिया बंद करावी असे नोटीसमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या शेजारील ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत. त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी अशी नोटिसदेखील बजावण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निलंबित!
अंबर कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहता यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांच व पंचवटी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईतून अटक करण्यात आली असून मालती मेहता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.