मुंबई : उत्तर मध्य मुंबई हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला. परंतु, २०१४ पासून भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केले. यावेळेस वर्षा गायकवाड यांना मैदानात आणून काँग्रेसने भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; पण अंतर्गत गटबाजी आणि 'देशद्रोही' विधानांमुळे आपसूकच आव्हान संपुष्टात आले.
मुंबईतील सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेला हा मतदारसंघ. त्यांची संख्या जवळपास ४ लाख २७ हजारांच्या घरात. त्यामुळे या मतांच्या जोरावर विजयाची गणिते काँग्रेसने जुळवली. त्यात वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देऊन आंबेडकरी समाजाची मते वळविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, ऐनवेळी विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून काँग्रेसच्या मतध्रुविकरणाच्या नीतीवर पाणी फेरले. दहशतवादी अजमल कसाबला निर्दोष सिद्ध करण्याच्या नादात त्यांनी पद्मश्री उज्ज्वल निकम यांना देशद्रोही संबोधले आणि तिथेच निवडणूक फिरली.
उत्तर मध्य मुंबईतील हिंदू समाज काँग्रेस विरोधात एकवटला. चांदिवली आणि कुर्ला या पट्ट्यातील हिंदूबहूल भागात वाढलेले मतदान हे त्याचेच द्योतक. २०१९ च्या तुलनेत चांदिवलीतील मतदान तब्ब्ल २४ हजारांनी वाढले. तर, कुर्ल्यातही १० हजारांची वाढ नोंदविण्यात आली. त्याला काँग्रेस अंतर्गत गटबाजीचीही जोड मिळाली. मुस्लिम मतदारांना आकृष्ट करू शकणारा मुंबई काँग्रेसमधील एकमेव चेहरा, नसीम खान शेवटपर्यंत घराबाहेर पडला नाही. त्याशिवाय भाई जगताप, माजी मंत्री सुरेश शेट्टी, अमरजीत मनहास यांनी जुन्या अपमानाचा वचपा काढत वर्षा गायकवाड यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली. त्यामुळे आयत्यावेळी उमेदवारी जाहीर होऊनही उज्ज्वल निकम यांची फारशी दमछाक झाली नाही.
उमेदवाराचे वडील आणि नसीम खान यांच्यातील सख्य
वर्षा गायकवाड यांची सगळी भिस्त ही मुस्लिम आणि दलित मतदारांवर होती. अशावेळी 'एमआएम'ने रमजान चौधरी यांना रिंगणात उतरवल्याने मुस्लिम मतांचे विभाजन झाले. विशेष म्हणजे चौधरी यांचे वडील आणि काँग्रेस नेते नसीम यांच्यातील जवळीक चर्चेचा विषय ठरली. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीने संतोष अंबुलगे यांच्या रुपाने उमेदवार दिल्यामुळे दलित मतांच्या विभाजनाचा फटकाही वर्षा गायकवाड यांना बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विधानसभानिहाय झालेले मतदान
मतदारसंघ मतदान टक्केवारी
विलेपार्ले १,५१,०५५ ५६.०१
चांदिवली २,१०,५२७ ४९.४३
कुर्ला १,४६,७६९ ५१.८६
कलिना १,२३,२७१ ५१.५८
वांद्रे पूर्व १,२७,८६५ ५२.२४
वांद्रे पश्चिम १,४७,०४३ ५२.१७