ठाणे : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अंबर कंपनीत मोठा स्फोट झाला असून या घटनेत २ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच यात अनेकजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ मधील अंबर कंपनीत गुरुवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. यावेळी सलग तीन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूच्या दुकानांच्या आणि इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. तसेच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. याशिवाय आजूबाजूच्या दुकानांवरील पाट्यासुद्धा फुटल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - मुलाने कार मागितली तर त्याला चालवायला दे; विशाल अग्रवालच्या ड्रायव्हरला सूचना
मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत काम करणारे ३० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. याठिकाणी बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर इत्यादी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी ८ जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तसेच जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.