एनडीए व इंडी आघाडीचे पूर्वांचलकडे लक्ष!

22 May 2024 19:42:14
Purvanchal nda indi alliance


नवी दिल्ली :    उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) आणि इंडी आघाडीने आपापली ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्यांनी डावपेच आखून विजयाचा दावा केला आहे. पूर्वांचलमध्ये लोकसभेच्या २७ जागा आहेत. त्यातील बहुसंख्य जागांवर विजय मिळविण्यासाठी रालोआने कंबर कसली आहे. विशेष बाब म्हणजे या भागात रालोआ घटकपक्ष सुभासपा, निषाद पक्ष आणि अपना दल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

त्याचवेळी यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये तर विक्रमी विजय मिळवण्याचा दावा भाजपने केला आहे. दुसरीकडे, इंडी आघाडीचा भाग असलेल्या तृणमूल काँग्रेसला एक जागा तर काँग्रेसला पाच जागा समाजवादी पक्षाने दिल्या आहेत. या जागांवर काँग्रेस आणि सपाने आपल्या आघाडीच्या नेत्यांना जबाबदारी दिली आहे.

वाराणसीतील महिला संमेलनांच्या माध्यमातून भाजपने नवा प्रयोग केला असून आजूबाजूच्या मतदारंसघांवरही त्याचा प्रभाव पडला आहे. भाजपने पूर्वांचलमध्ये जागांवर जल जीवन मिशन, आवास योजना, शौचालये आणि इतर योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची ब्लॉकनिहाय यादी तयार केली आहे. या यादीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघ तीन ते चार भागात विभागून वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जात आहेत. नव्या रणनीतीअंतर्गत गट बैठकीचे नियोजन केले आहे. यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, कापड व्यापारी, औषध व्यापारी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. उदाहरणादाखल वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या नेत्यांना या क्षेत्रातील लोकांना भेटण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

पूर्वांचलसाठी काँग्रेस आणि सपानेही रायबरेली-अमेठी मॉडेल लागू केले आहे. विधानसभा मतदारसंघाची विभागणी करून ज्या समाजाची व्होट बँक आहे, त्या समाजाच्या नेत्याची बूथवर नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांनी यादव-मुस्लीम वगळता अन्य जातींच्या नेत्यांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.


पूर्वांचलमध्ये हे आहेत महत्त्वाचे उमेदवार

वाराणसी – पंतप्रधान नरेंद्र मोदी – भाजप
आझमगध – धर्मेंद्र यादव – सपा
भदोही – ललितेशपती त्रिपाठी – तृणमूल काँग्रेस
जौनपूर – कृपाशंकर सिंह – भाजप
मिर्झापूर – अनुप्रिया पटेल – अपना जल
घोसी – अरविंद राजभर – सुभासपा 



Powered By Sangraha 9.0