लोकसभा निवडणूकीत 'स्मार्ट' प्रचार! Google Ads साठी राजकीय पक्षांची चढाओढ

21 May 2024 17:22:14

bjp cogress

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पाचव्या टप्प्यातील निवडणूका संपल्या असल्या तरीही लोकसभेच्या निवडणूकांच्या प्रचारतोफा थंडावलेल्या नाहीत. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल पायंडा पाडला आहे. गूगलच्या अॅड ट्रान्सपरन्सी डेटानुसार, भाजपने यावर्षाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत शंभर कोटींची गुंतवणूक केली. यापैकी ४० कोटी हे केवळ मे महिन्यात खर्च झाले आहेत. ज्या ठिकाणी विरोधी पक्षांचे तगडे आव्हान होते तिथे हा डिजिटल प्रचार अधिक जोरदार करण्यात आला होता.
 
याशिवाय विरोधी पक्षातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसनेही डिजिटल जाहीरातींवर भरपूर खर्च केला आहे. पूर्वी चौथ्यास्थानावर असलेल्या काँग्रेस पक्षाने ३९ रुपये जाहीरातींवर खर्च करत दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. मे महिन्यातच काँग्रेसने डिजिटल जाहिरातींसाठी १२ कोटी रुपये खर्च केले आहेत. गुगलने २०२४ या वर्षात १ जानेवारी ते २० मे पर्यंत २५६ कोटींची कमाई केवळ राजकीय जाहिरातींद्वारे केली आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात (२० मे पर्यंत) १६० कोटी रुपये खर्च झाले आहेत.
 
जाहिरातींमध्ये दोन तृतीयांश खर्च हा व्हिडिओ जाहिरातींवर झाला आहे. लोकसभा निवडणूकीचा प्रचार १९ एप्रिल रोजी सुरू झाला होता. पाच टप्प्यातील निवडणूकांचा प्रचार पूर्ण झाल्यानंतर सहाव्या टप्प्यासाठी २५ मे आणि सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी होईल. ३१ मे पर्यंत सर्व देशातील प्रचारतोफा थंडावतील आणि ४ जून रोजी निकाल घोषित केले जातील. चेन्नईस्थित पॉप्युलस एम्पावरमेंट नेटवर्क (PEN) आणि मुंबईतील I-PAC सारख्या सल्लागार कंपन्यानीही गुगलच्या महसुलात योगदान दिले आहे.
 
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासाठी त्यांचे जावई व्ही. सबरीसन यांच्या PEN कंपनीने २०२४ मध्ये १६.६ कोटी रुपये खर्च केले. प्रशांत किशोर यांच्या I-PAC, कंपनीने ८.९ कोटी रुपये खर्च केले. बीजू जनता दलाने (१३.७ कोटी रुपये), ओदिशा सरकारने (३.४ कोटी रुपये) आणि YSR काँग्रेस (१२.८ कोटी रुपये) आणि अन्य पक्षांनी गुगलच्या जाहीरातींमध्ये आघाडी घेतली आहे. ओदिशा आणि आंध्रप्रदेशमध्ये एकाच वेळी विधानसभा निवडणूका घेतल्या जाऊ शकतात. या वर्षात आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक राजकीय जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या.




Powered By Sangraha 9.0