रा. स्व. संघामुळेच देशभक्ती आणि नि:पक्षपाताचे धडे मिळाले – न्या. चित्त रंजन दास

21 May 2024 18:26:31
Chitta Ranjan Das On Rss

नवी दिल्ली:
आपल्या व्यक्तीमत्वास आकार देण्याचे आणि देशभक्तीचा मार्ग दाखविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (रा. स्व. संघ) केला आहे, अशी भावना कोलकाता उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती चित्त रंजन दास यांनी व्यक्त केली आहे.कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती चित्त रंजन दास हे सोमवारी सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात न्या. दास यांनी आपल्या कारकिर्दीस आकार देणाऱ्या बाबींचा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले, आपले खरे स्वरूप आज सांगण्याची योग्य वेळ आहे. आपण लहानपणापासून तारूण्यापर्यंत एका संघटनेमध्ये कार्यरत होतो. तेथेच मला धाडस, प्रामाणिकपणे, इतरांप्रती समान दृष्टीकोन बाळगणे आणि आपल्या कामाच्या ठिकाणी देशभक्ती व बांधिलकी बाळगण्याची शिकवण मिळाली. त्यामुळे आपण रा. स्व. संघाचे सदस्य होतो आणि अजुनही असल्याचे सांगण्यास आपल्याला अडचण नसल्याचे न्या. दास म्हणाले.

न्यायमूर्ती असताना आपण रा. स्व. संघापासून दूर झाल्याचे आणि कोणत्याही पक्षाचे खटले अतिशय नि:पक्षपातीपणे हाताळल्याचे न्या. दास यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कामाच्या स्वरूपामुळे आपण जवळपास ३७ वर्षे आपल्या संघटनेपासून दूर होतो. त्या संघटनेच्या सदस्यत्वाचा वापर कधीही कारकिर्दीमध्ये पुढे जाण्यासाठी केला नाही, कारण तसे आपल्या संघटनेचे तत्त्व नाही. काम करताना कम्युनिस्ट कार्यकर्ता असो, भाजपचा असो अथवा तृणमूल काँग्रेसचा असो; प्रत्येकास समान वागणूक दिली असून पूर्वग्रह ठेवला नसल्याचेही न्या. दास यांनी नमूद केले आहे.
 
मूळचे ओडिशाचे असलेले न्यायमूर्ती दास यांनी १९८६ मध्ये वकील म्हणून नावनोंदणी केली. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी ओडिशा न्यायिक सेवेत प्रवेश केला आणि राज्याच्या विविध भागात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची ओडिशा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार (प्रशासन) म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे १० ऑक्टोबर २००९ रोजी त्यांना ओरिसा उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती देण्यात आली आणि २० जून २०२२ रोजी त्यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

  
 
Powered By Sangraha 9.0