मुंबई तरुण भारत विशेष: देशाचे आईस्क्रीम किंग नॅचरल आईस्क्रीमचे रघुनंदन कामत यांचे निधन

20 May 2024 15:23:24

Raghunandan Kamath
 
मोहित सोमण
 
नॅचरल आईस्क्रीम हे देशातील मोठा आईस्क्रीम ब्रँड! देशातील नामवंत आईस्क्रीममधून अगदी चोखंदळ व्यक्तीलाही आवडेल असे आईस्क्रीम! खूप कष्टाने कामत कुटुंबातील सदस्यांनी हा ब्रँड उभारला. आज आईस्क्रीम ब्रँडचे संस्थापक रघुनंदन कामत यांचे निधन झाले आहे. आईस्क्रीम विश्वातील एक तप आज संपले आहे. विशेषतः नैसर्गिक पद्धतीने आईस्क्रीम कसे असावे याचा झंझावात आज मावळला आहे.
 
नावानेच लक्षात येईल अशी नॅचरल आईस्क्रीमची टेस्टच खास नॅचरल! याची सुरुवात कशी झाली ते देखील रंजक आहे.१९८४ साली कामत कुटुंब मुंबईत आल्यानंतर नॅचरल आईस्क्रीमची स्थापना करण्यात आली सुरूवात छोट्या भांडवलात, कमी कर्मचाऱ्यांसह झाली मात्र तेव्हा यांचा वटवृक्ष होईल ते त्यांनी कदाचितच ठरवले असेल. उत्तरोत्तर आईस्क्रीमची चव चाखत मुंबईकरांनी या आईस्क्रीमला तुडुंब प्रतिसाद दिला. मूळचे कामत मंगलोरचे असल्याने आंब्यावर विशेष प्रेम, त्याची कापणी, प्रकिया, दुधाची पातळी, त्यावर प्रक्रिया करत आईस्क्रीम याबद्दल कामत कुटुंबातील विशेष प्राविण्य रघुनंदन कामत यांनी आत्मसात केले परिणामी हाताने बनवलेल्या आईस्क्रीमची (विना केमिकल न घालता) गोठलेल्या व गोठवलेल्या आईस्क्रीमची सुंदर चव अनेकांना घायाळ करुन गेली.
 
सुरूवातीला जुहू चौपाटीवर सुरु केलेले आईस्क्रीमचा ब्रँड आज संपूर्ण भारतात पसरला आहे.१५ शहरांमध्ये १६५ हून अधिक आउटलेट नॅचरल आईस्क्रीमची आहेत. शेकडो, हजारो कर्मचारी आज 'नॅचरल' साठी काम करतात. कामत यांच्या आईस्क्रीम बनवण्याची पद्धत स्पेशलिटी होती. आंब्यासह इतर फळ व फ्लेवरची विक्री सुरू केल्यानंतरही त्यांनी त्यांची मानके कायम ठेवली. कुठल्याही केमिकल विरहित आईस्क्रीमची पद्धत इतर फ्लेवर्सच्या आईस्क्रीममध्ये आजही कायम राहिली आहे. त्यांच्या आईस्क्रीमचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चवीत कधीही तडजोड केली नाही. भारतातील कुठल्याही आउटलेट मध्ये सारखी चव, सारखे प्रमाण, सारखा देखावा या गुणांमुळे आजही नॅचरल आईस्क्रीमची मागणी वाढतच चालली आहे. १९९४ साली त्यांनी आपला ब्रँड वाढवण्यास सुरूवात केली.आजही साधारणपणे दरवर्षी त्यांच्या शाखेत वाढ होत असते.
 
वयाच्या १४ व्या वर्षी शिक्षण सोडून भावाचा व्यवसायात मदत करत रघुनंदन कामत यांनी करिअरची सुरुवात केली होती. परंतु एखाद्या व्यवस्थापन विषयातील तज्ज्ञाला लाजवेल अशी व्यवसायाची उभारणी त्यांनी केली आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे. परंतु त्यांनी आईस्क्रीम उद्योगातील कमावलेले नाव कायमचे लक्षात राहील.
 
व्यवस्थापनात अथवा सेवा क्षेत्रातील उद्योगांमध्ये ' दर्जा, ' व्यवस्थापन, नफा, कामाची पद्धत,कर्मचारी सांभाळणे, ब्रँडिंग खूप महत्वाचे आहे. जे रघुनंदन कामत यांनी ४० वर्षांपूर्वी ओळखले होते. आज साधारणपणे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, आंबा, चॉकलेट अशा केवळ पारंपरिक आईस्क्रीमवर अवलंबून न राहता पेरू, कलिंगड, सीताफळ, नारळ, मलबेरी,द्राक्ष, केळी, अशा अपारंपारिक फळांचे आईस्क्रीम बनवण्यास नॅचरलने सुरूवात केली. परिणामी लोकांना नैसर्गिक फळांची आईस्क्रीम मिळू लागली.
 
कुठल्याही व्यवसायात स्पर्धा वाढल्यावर नावीन्य आवश्यक असते. ते ओळखतच कामत यांनी वाटचाल सुरू केली. बिझनेस कसा करावा याचा उलगडा नव्याने कामत यांनी तरूण पिढीला दिला आहे. कुठल्याही दर्जात वाटाघाटी न करता व्यवसाय वृद्धिंगत करता येतो हे नॅचरल ब्रँडच्या उलाढालीवरून लक्षात येते‌. कामथ यांनी घटक म्हणून फळ, साखर आणि दूध या मुख्य घटकांवर लक्ष केंद्रित केले जे त्यांच्या ब्रँड लोगोवरूनही लक्षात येईल ' Taste the Orginal ' या वाक्यातूनच आपल्याला लक्षात येईल. विशेषतः ३९ वर्ष जुना व्यवसाय आजही वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे काळानुसार आईस्क्रीममध्ये दर्जात्मक बदल केला नसला तरी त्यांनी नवनवीन उत्पादने बाजारात आणून आपल्या मार्केटिंगमध्ये नेहमी बदल केले परिणामी आजही नवख्या माणसापासून वृद्धांपर्यंत नॅचरल आईस्क्रीम सगळ्यांच्या गळ्यातले ताईत झाले आहे.
 
आता अगदी गाजर हलवा, तिळगुळ व तत्सम पदार्थांचे देखील आईस्क्रीममधून तुम्ही नॅचरलची चव चाखू शकता. असं म्हटले जाते की कामत यांनी फळांची, दुधाची निवड देखील चोखंदळपणे केली होती. त्यामुळे चवीतही बदल घडण्याचा प्रश्नच नव्हता. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहेत. यासंबंधीची माहिती ही कंपनीने सोशल मीडियावर शेअर केली होती. आज या धगधगत्या व्यवसायिकाचा शेवट झाला असला तरी कामत परिवार याहून नॅचरल ब्रँड मोठा करणार असा विश्वास वाटतो.
 
१६५ हून अधिक आउटलेट असलेल्या या ब्रँडचा जगातील पहिल्या १०० आईस्क्रीम ब्रँडमध्ये समावेश आहे हे भारतासाठी देखील कौतुकास पात्र आहे. तरी रघुनंदन कामत यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
Powered By Sangraha 9.0