गुजरातमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक!

20 May 2024 16:31:43
Gujarat Terrorists Arrested

 
नवी दिल्ली : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) इस्लामिक स्टेट (ISIS) च्या ४ दहशतवाद्यांना अहमदाबाद, गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. हे सर्वजण श्रीलंकेतून भारतात आले. त्यांना दि. २० मे २०२४ रोजी पकडण्यात आले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद विमानतळावर ISIS चे चार दहशतवादी कोणाची तरी वाट पाहत होते. केंद्रीय सुरक्षा दलांकडून सूचना मिळाल्यानंतर गुजरात एटीएसने त्यांना अटक केली. हे हे चार दहशतवादी एका पाकिस्तानी दहशतवाद्याच्या सूचनेनुसार काम करत होते, असे सांगण्यात येत आहे.
 
त्यांना गुजरातमध्येच शस्त्रे दिली जाणार होती, त्यानंतर काही मोठी घटना घडवून आणण्याचा त्यांचा कट होता, असेही सांगण्यात आले आहे. गुजरात एटीएसने त्यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी सुरु आहे. हे चौघे भारतात कुठल्या प्रकारची दहशतवादी कारवाया करण्यासाठी आले होते आणि भारतात त्यांचा मदतनीस कोण होता, याचा शोध घेतला जात आहे.
 
हे चौघेही श्रीलंकेचे नागरिक असून ते श्रीलंकेतून चेन्नईत आले होते, असेही समोर आले आहे. यानंतर ते येथून गुजरातमध्ये पोहोचले. या दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर अहमदाबाद विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र या चार दहशतवाद्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
 
 
Powered By Sangraha 9.0