काँग्रेस का हाथ, पाकिस्तान के साथ!

    02-May-2024
Total Views |
 pakistan
 
राहुल गांधी यांचे गुणगान आणि मोदी यांच्यावर अतिरेकी टीका करून पाकिस्तानी नेत्याने काँग्रेस व पाकिस्तान यांचे कसे मधुर संबंध आहेत, त्यावरच प्रकाश टाकला आहे. एकीकडे उरी आणि पुलवामा हल्ल्यांनंतर मोदी यांनी पाकिस्तानात घुसून केलेली लष्करी कारवाई आणि 26/11 हल्ल्यानंतरही निष्क्रिय राहिलेले काँग्रेस सरकार हाच या दोन पक्षांमधील ठळक फरक. ‘टुकडे टुकडे गँग’चा नेता कन्हैयाकुमारला काँग्रेसने दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी दिली असून, काँग्रेसच्या पाकिस्तानप्रेमाचा यापेक्षा वेगळा पुरावा काय असू शकतो?
 
सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसृत केला, तेव्हाच ‘हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की मुस्लीम लीगचा,’ असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता. केवळ विरोधी पक्ष असल्यामुळे भाजपने ही टीका केलेली नव्हती, तर त्यातील आश्वासने ही उघडपणे मुस्लीमधार्जिणी होती. आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या फवाद चौधरी यांनी राहुल गांधी यांचे गुणगान करणारा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा संदेश प्रसृत केला आहे. राहुल गांधी यांच्या सध्याच्या निवडणुकीतील प्रचाराच्या भाषणांवर हे चौधरी महाशय भलतेच खुश झाले असून, त्यांनी राहुल गांधी हे अग्निज्वालेप्रमाणे तेजस्वी आहेत, असे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्यात काहीच सकारात्मक गोष्ट नसून, ते तर दहशतवादी (विचारसरणीचे) आहेत, असेही नमूद केले आहे.
 
मुळात पाकिस्तानातील नेत्यांना भारतातील लोकसभा निवडणुकीत इतके स्वारस्य का वाटावे? त्यातही भारतात काँग्रेस पुन्हा सत्तेवर येते आहे की नाही, याबद्दल त्यांना आशा का वाटावी, हाही विचार करण्यासारखा मुद्दा. आजघडीला जगभरातील सर्व मुस्लीम देश हे भारताच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. काश्मीर प्रश्नावर सौदी अरेबियापासून बहुतेक सर्व मुस्लीम देशांनी भारताचीच बाजू उचलून धरली. पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेतही पाकिस्तानविरोधात असंतोष खदखदत असून, काश्मिरी जनतेला भारतात सामील व्हायचे आहे. हा सर्व मोदी यांच्या कार्याचा परिणाम आहे, हे पाकिस्तान ओळखून आहे. म्हणूनच मोदींना सत्तेवरून दूर करण्यासाठी भारतातील मुस्लीम मतदारांचे काँग्रेसच्या बाजूने ध्रुवीकरण करण्याचे डावपेच खेळले जात आहेत.
 
पाकिस्तानच्या दहशतवादाकडे काँग्रेस सरकारने हेतूत: कानाडोळा केल्यामुळे पाकिस्तानला पहिल्यापासूनच काँग्रेसबद्दल आपुलकी वाटत आली आहे. आता भारतात काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने पाकिस्तानी सत्तेच्या वर्तुळात निराशेचे वातावरण आहे. म्हणूनच काँग्रेसला नैतिक पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भारतातील मुस्लिमांना ‘व्होट जिहाद’ करण्याचे आवाहन केल्यावर पाकिस्तानी नेत्याने राहुल गांधी यांचे कौतुक करणे, हे सूचक आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फवाद चौधरी यांच्या या ट्विटचा समाचार घेताना पाकिस्तानला राहुल गांधी हेच पंतप्रधान का व्हावयास हवे आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसच्या विजयामुळे पाकिस्तानात का आनंदोत्सव होतो, असा प्रश्न विचारून मोदी यांनी काँग्रेस-पाकिस्तानमधील समान दुवा सूचित केला. म्हणा, काँग्रेसचे पाकिस्तानप्रेम लपून राहिलेले नाही. नेहरूंच्या काळापासूनच पाकिस्तानला सतत झुकते माप देणे आणि त्या देशाकडून होणार्‍या भारतविरोधी दहशतवादी कारवायांबाबत मवाळ धोरण स्वीकारणे, हे काँग्रेसचे व्यवच्छेदक लक्षण राहिले. मुंबईवर दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाब आणि त्याच्या सहकार्‍यांमार्फत करण्यात आलेला भीषण हल्ला हे खरे तर छोटेखानी युद्धच होते. तरीही पाकिस्तानचा ‘कठोर शब्दांत निषेध’ करणारे पत्र देण्याखेरीज काँग्रेस सरकारने काहीही केले नाही. उलट हा हल्ला भारतातील हिंदू दहशतवाद्यांनीच घडवून आणला होता, अशी कथा पसरविण्यात येत होती. तेव्हा काँग्रेसचे दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम हे मंत्री ‘भगव्या दहशतवादा’चा अपप्रचार करीत होते. अनेक कट्टर मुस्लीम अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये आणि भारताच्या अन्य भागांत घातलेल्या हिंसाचाराचे वर्णन काँग्रेसने कधी ‘इस्लामी किंवा हिरवा दहशतवाद’ असे केले नव्हते. पण, कसाबच्या हल्ल्याचे वर्णन मात्र ‘भगवा दहशतवाद’ असे करण्यात येत होते. उलट उरी आणि पुलवामा येथे स्फोट घडवून भारतीय सैनिकांचे प्राण घेतल्यावर मोदी यांनी पाकिस्तात दडून बसलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्करी कारवाई केली होती. तेव्हापासून पाकिस्तानने भारताची कुरापत काढलेली नाही. हाच काँग्रेस आणि भाजप सरकारमधील प्रमुख फरक आहे.
 
‘समझोता एक्सप्रेस’मध्ये झालेल्या स्फोटातील मुस्लीम आरोपींना सोडून देण्यात आले होते आणि त्यांच्याऐवजी काही हिंदूंना आरोपी बनविण्यात आले होते. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातही महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा यांना हेतूत: गोवले आणि चौकशीदरम्यान त्यांचे अनन्वित हाल केले. इतकेच नव्हे, तर सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान आखले जात होते, असे स्वत: योगी आदित्यनाथ यांनीच सांगितले. कालांतराने साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्याविरोधात पुरावाच नसल्यामुळे त्यांना सोडून द्यावे लागले होते. नरेंद्र मोदींना सत्तेवरून दूर करण्यासाठी आमची मदत करा, अशी मागणी तत्कालीन केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे केली होती. त्याचप्रमाणे काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम 370’ पुनर्स्थापित करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तान व चीनला मदतीचे आवाहन केले होते.
 
भारताला कमकुवत करण्यासाठी भारताचे शेजारी देश टपूनच बसले आहेत. दुर्दैवाची गोष्ट इतकीच की, या परकीय शक्तींना बळ देणारे ‘हात’ भारतातच उपस्थित आहेत. भारताला लष्करी ताकदीच्या जोरावर नमविणे अशक्य आहे, ही गोष्ट दोन्ही शेजार्‍यांना कळून चुकली आहे. त्यामुळे त्यांनी आता अधिक कुटिल डाव खेळला आहे. भारतातीलच काँग्रेससारख्या मुस्लीमधार्जिण्या पक्षाला हाताशी धरून देशात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. ‘व्होट जिहाद’सारख्या संकल्पना एकाएकी हवेतून अवतरलेल्या नाहीत. मुस्लीम मतांच्या जोरावर भाजपचा विजयाचा वारू रोखण्याचा हा दुबळा, पण निर्धारयुक्त प्रयत्न आहे. काँग्रेसने ‘भारत तेरे टुकडे टुकडे होंगे’ आणि ‘लेके रहेंगे आझादी’ अशी घोषणा देणार्‍या कन्हैया कुमारलाच दिल्लीमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या भारतविरोधी आणि पाकिस्तानप्रेमाचा यापेक्षा वेगळा पुरावा काय असू शकतो?