मध्य प्रदेशचा कल भाजपकडेच, काँग्रेसची अस्तित्वाची लढाई

    02-May-2024
Total Views |
mohan yadav

देशभरातील अन्य राज्यांसह मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा ढिसाळपणा दिसून येत आहे. इंदूर या राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज नुकताच मागे घेतला. एवढेच नव्हे, तर त्याने भाजपमध्येही प्रवेश केला. या उदाहरणाद्वारे काँग्रेस राज्यात किती गांभीर्याने निवडणूक लढत आहे, हेच दिसून येते.

लोकसभेच्या २९ जागा असलेल्या मध्य प्रदेशात २०१४ आणि २०१९ साली भाजपने मोठे यश मिळवले होते. गतवेळी २९ पैकी २८ जागांवर भाजपने विजय प्राप्त केला होता. त्यामुळे यंदाही भाजपने त्याच यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसला मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या टप्प्यांमध्ये काँग्रेसने कोणत्याही प्रकारचा संघर्ष केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरातील अन्य राज्यांसह येथेही काँग्रेसचा ढिसाळपणा दिसून येत आहे. इंदूर या राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतला. एवढेच नव्हे, तर त्याने भाजपमध्येही प्रवेश केला. या उदाहरणाद्वारे काँग्रेस राज्यात किती गांभीर्याने निवडणूक लढत आहे, हेच दिसून येते.
 
मध्य प्रदेशसाठी यंदाची लोकसभा निवडणूक अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, २०१९ साली झालेल्या झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. राज्यात २०१८ मध्ये मध्य प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असताना राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी भाजपसमोर दबावासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आता २०२४ मध्ये निवडणुका होत असताना राज्यात प्रचंड बहुमताने भाजपचे सरकार आहे. मध्य प्रदेशात जवळपास १७ वर्षे भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले शिवराजसिंह चौहान यावेळी लोकसभा लढवत आहेत. त्यांच्या जागी डॉ. मोहन यादव यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. बुधनीचे आमदार शिवराजसिंह चौहान यांना भाजपने विदिशा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे २०१८ मध्ये कमलनाथ काँग्रेसचे अध्यक्ष असताना, राज्यात काँग्रेसची सत्ता आली होती. मात्र, हे सरकार केवळ दीड वर्षच टिकू शकले.
 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला. यानंतर कमलनाथ यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता मध्य प्रदेशात जितू पटवारी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलेले कमलनाथही आता पक्षाला कंटाळल्याचे दिसते. माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह देखील फारसा उत्साह दाखवत नाहीत. माजी केंद्रीय मंत्री सुरेश पचौरी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी २०२० मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता काँग्रेसकडे अनुभवी नेत्यांची कमतरता आहे, केवळ नेतेच नव्हे, तर उमेदवारांचीही वानवा काँग्रेसला भेडसावते आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच भाजपने सर्व २९ लोकसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्याचवेळी काँग्रेसने आपले उमेदवारी जाहीर करण्यासाठी विलंब केला होता.
 
मध्य प्रदेशात ज्या जागांवर भाजपशी चुरशीची लढत होईल, त्या जागांवर काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जाण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत आघाडीच्या कोणत्याही पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सभा राज्यात झालेली नाही. तिसर्‍या टप्प्यात मतदान होणार्‍या गुना, ग्वाल्हेर आणि भिंडमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या सभांसाठी सपाने पुढाकार घेऊन अखिलेश यांच्या सभांचा प्रस्ताव काँग्रेसला दिला. मात्र, त्यावरही निर्णय झालेला नाही. ‘इंडी’ आघाडीतर्फे एप्रिलच्या प्रारंभी झालेल्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी निर्णय घेतला होता की, जेथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होतील, तेथे घटक पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहतील. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वजण एकत्रित ताकद लावणार असल्याचाही दावा करण्यात आला होता. ‘इंडी’ आघाडीतील घटकपक्ष आपापली मते वळवण्यात भूमिका बजावती. मात्र, या निर्णयानुसार अद्यापतरी काम होताना दिसत नाही.
 
तिसर्‍या टप्प्यात हाय-प्रोफाईल लढती
मध्य प्रदेशात पहिल्या दोन टप्प्यात एकूण १३ जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यात उर्वरित १६ जागांसाठी मतदान होणार आहे. तिसर्‍या टप्प्यात अनेक हाय-प्रोफाईल जागांचा समावेश असून, त्यात राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. यामध्ये विदिशामधून शिवराजसिंह चौहान, राजगढमधून दिग्विजय सिंह आणि गुणा-शिवपुरीमधून ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक रिंगणात आहेत.
 
राजगढची निवडणूक रंजक बनली आहे. एकीकडे दिग्विजय सिंह चौफेर प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे भाजपही त्यांना कोंडीत पकडण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. या मतदारंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही सभा झाली. दोनवेळा खासदार राहिलेल्या रोडमल नागर यांना भाजपने राजगढमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजप राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या कामांचा दाखला देत आहे.
 
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २० वर्षांनंतर पुन्हा विदिशामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी ते पाच वेळा येथून खासदार झाले होते. यात्रा, नुक्कड सभा आणि रोड शोच्या माध्यमातून ते आपल्या भागातील मतदारांशी सतत संपर्क साधत आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदींनीही एका निवडणूक प्रचारसभेत शिवराजसिंह यांना दिल्लीला घेऊन जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राष्ट्रीय राजकारणात त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यांच्या विरोधात काँग्रेसने विदिशामधून दोनवेळा खासदार राहिलेले प्रताप भानू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
गुणा-शिवपुरी लोकसभा मतदारसंघात यावेळी चित्र बदलले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपने विद्यमान खासदार के. पी. यादव यांच्याऐवजी त्यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत के. पी. यादव यांनी सिंधिया यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्याचवेळी काँग्रेसनेही भाजपच्या विरोधातच डावपेच वापरत येथून यादव उमेदवार दिला आहे. गुणा येथून अशोकनगर जिल्ह्यातील यादवेंद्र सिंह यांना पक्षाने तिकीट दिले आहे. या येथे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी भाजपच्या वतीने प्रचार केला आहे.