कशेडी बोगद्यातून गोव्याहून मुंबईकडे जाण्यास परवानगी

02 May 2024 20:31:39

kashedi


मुंबई, दि.२ : 
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीतील एका बोगद्यामधून दुतर्फा वाहतूक सोमवारपासून (ता. १) सुरू करण्यात आली. हलक्या वाहनानांच परवानगी दिलेली असताना रात्रीच्यावेळी अवजड वाहने दुसऱ्या बाजूने बोगद्यातून ये-जा करतात. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. मात्र महाराष्ट्र दिनाच्यादिवशीच कोकणातील कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरूवात झाली आहे. कशेडी बोगद्यातून सुरू झालेल्या दुतर्फा वाहतुकीमुळे तब्बल ४५ मिनिटांचा वेळ लागणारा प्रवास आता फक्त ८ मिनिटांवर आला आहे. कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरुवात झाल्याने कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

दरम्यान, शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कशेडी घाटातील बोगद्याचा एकेरी मार्ग सुरू करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून बोगद्यातील प्रलंबित कामांना गती देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यादरम्यान कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीला सुरूवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाने आता लहान वाहनांना सध्या वाहतूक सुरू असलेल्या बोगद्यातून प्रवेशाची परवानगी दिली आहे. आता कशेडीतील एका बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे.

राष्ट्रीय महामार्ग मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते गोवा जाणाऱ्या लहान वाहनांना कशेडी बोगद्याचे प्रवेश देण्यात येत होता; परंतू गोव्याहून मुंबईकडे जाण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. सातत्याने प्रवाशांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन हलक्या वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे. परंतु छोट्या वाहनांना बोगदा अथवा जोडरस्त्यावर थांबता येणार नाही. ताशी ४० किमी वेग मर्यादा पाळावी लागेल. एसटी बस, मालवाहू ट्रक, टँकर, डंपर यासह अवजड वाहनांना कोणत्याही परिस्थितीत बोगद्याचा वापर करता येणार नाही. अवजड वाहने कशेडी घाट मार्गे मुंबई-गोवा व गोवा-मुंबई मार्गक्रमण करतील.
Powered By Sangraha 9.0