पवारांनी केली की स्ट्रॅटेजी अन् आम्ही केली तर गद्दारी? : अजित पवार

02 May 2024 18:03:40
 
Ajit Pawar
 
पुणे : शरद पवारांनी केली की स्ट्रॅटेजी अन् आम्ही केली तर गद्दारी? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. गुरुवारी इंदापूर येथे आयोजित महायूतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीबद्दलही खुलासा केला आहे. तसेच सर्व बाबींचा तारखांसहित तपशील देत त्यांनी अनेक गोष्टी उघड केल्या.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "२०१४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मी मुंबईला पोहोचायच्या आत टीव्हीवर बातमी झळकली की, प्रफुल पटेलांनी बाहेर येऊन सिल्वरओकला सांगितलं की, आमचा भाजपला बाहेरून पाठिंबा आहे. त्यावेळी मी विचारलं तर साहेब मला म्हणाले की, ही आपली स्ट्रॅटेजी आहे. यांनी केली तर स्ट्रॅटेजी आणि मी केलं की गद्दारी. त्यानंतर मी गप्प बसलो. पुढे आम्हाला सांगितलं की, सर्वांनी शपथविधीला जा. शपथविधी झाला आणि आम्हाला सांगितलं की, आपल्याला काही महिन्यांनी त्या सरकारमध्ये जायचं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी विस्तारवाढ केला नाही."
 
"त्यानंतर अलिबागमध्ये एक मिटींग झाली. त्या मिटींगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की, भाजपने कायमचा आमचा पाठींबा गृहीत धरु नये. आमचा पाठिंबा आता संपला आहे. संध्याकाळी लगेच मातोश्रीला मिटींग झाली आणि शिवसेनेसोबत सरकार स्थापन झालं. त्यानंतर २०१४ ते २०१९ कसा कारभार झाला हे माहितीच आहे," असे ते म्हणाले.
 
तसेच ही निवडणूक गावकी, भावकीची निवडणूक नाही तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान पाहिजेत की, राहूल गांधी हे जनतेने ठरवायचं आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी बारामतीत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0