जम्मू-काश्मीर लोकसभा निवडणुकांकडे भारतीयांचे लक्ष

    19-May-2024
Total Views |
jk
 
वादग्रस्त ‘कलम ३७०’ निरस्त केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिलीच लोकसभेची निवडणूक होत आहे. भाजपने दोन जागावगळता या निवडणुकीत उमेदवार दिलेले नाहीत. ‘कलम ३७०’ रद्द केल्यानंतर काश्मीर कात टाकत आहे. इथल्या युवावर्गाला बदल हवा आहे. त्यामुळे या सगळ्यांवर काश्मीर काय कौल देते याकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे.
 
भारत सरकारकडून ‘कलम ३७०’ कायदेशीररित्या हटविले गेल्यानंतर आणि त्या निर्णयावर सर्वोच्चन्यायालयाचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जम्मू आणि उधमपूरमधील दोन जागांचा अपवाद वगळता उभे नसले, तरी काश्मीरमधील जुन्या दोन्हीही राजकीय पक्षांनी म्हणजेच अब्दुल्ला घराण्याचा ‘नॅशनल कॉन्फरन्स’ हा राजकीय पक्ष आणि मेहबुबा मुफ्ती यांचा ‘पी.डी.पी’ यांनी आपापल्या पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत उभे केले आहेत. हे दोन्ही राजकीय पक्ष वगळता ‘डेमोक्रेटिक प्रोग्रेस आझाद पार्टी’ आणि ‘जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर अपनी पार्टी’ पक्षाच्या उमेदवारांनी पहिल्यांदाच आपापले उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. लोकसभेच्या एकूण पाच जागांवर निवडणुका होत असल्या, तरी एकंदरीत तेथील जनतेचा कौल काय आहे, याचा अंदाज या निवडणुकीच्या निकालानंतर समोर येताना दिसू शकेल. सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू आणि काश्मीर मधील पाच लोकसभा जागांवरील निवडणुका पाच टप्प्यांत घेण्यात आल्याचे दिसते आहे.
 
सोमवार, दि. १३ मे रोजी चौथ्या फेरीतील झालेल्या ४० टक्के मतदानानंतर तर एकंदरीत उत्सुकता वाढलेलीच आहे. कारण, यापूर्वी साल २०१९ पर्यंत २० टक्क्यांच्या पलीकडे मतदान होताना दिसत नव्हते. चौथ्या फेरीमध्ये श्रीनगरमधील लोकसभेच्या जागेसाठी सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान झाले. भारतीय जनता पक्षाने जम्मूमधील दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. डॉक्टर जितेंद्र सिंग हा भाजपचा, नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातील मंत्रिपदावर राहिलेला ओळखीचा चेहरा, उधमपूरमधून भाजपच्या चिन्हावर तिसर्‍यांदा याच मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहे. उधमपूरमधील निवडणुकीमध्ये ६८ टक्के मतदान झाले होते.
 
जुगल किशोर हे जम्मूमधून भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. जम्मू, उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग-राजौरी या पाच जागांपैकी लोकसभेच्या तीन जागांवर लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलेले आहे. पाच जागांवर एकूण पाच टप्प्यांत मतदान पार पडेल. आता सोमवार, दि. २० मे आणि त्यापुढील टप्प्यात उर्वरित दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक पार पडेल, आणि मंगळवार, दि. ४ जून रोजी या सर्व पाच जागांचा निकाल जाहीर होईल. आता सोमवार, दि. २० मे आणि शनिवार, दि. २५ मे रोजी बारामुल्ला आणि अनंतनाग येथे उर्वरित दोन जागांसाठी मतदान पार पडेल.
श्रीनगर, बारामुल्ला आणि अनंतनाग या लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रात मुस्लीमबहुल लोकसंख्या मोठी आहे. सुमारे ६० टक्के ते ७० टक्के स्थानिक मुस्लीम मतदात्यांचे, या तीन लोकसभा मतदारसंघात प्राबल्य आहे. या लोकसभा निवडणुकीत हे बहुसंख्य सामान्य मुस्लीम मतदार कसे व्यक्त होतील, यावर काश्मीरची पुढील वाटचाल ठरणार आहे.
 
अनंतनाग लोकसभा मतदारसंघामध्ये जम्मूचा काही भाग येतो. या भागामध्ये गुज्जर, पहाडी यांची मतदार संख्या लक्षवेधी आहे. ‘पहाडी’ जमातीच्या लोकांना ‘शेड्युल ट्राइब’ मध्ये समाविष्ट करून घेतले गेल्याने, त्यांचा सत्ताधारी भाजपकडे ओढा असू शकतो. पण, पहाडी लोकांना ‘शेड्युल ट्राइब’ मध्ये समाविष्ट करून घेतल्याने, ‘गुज्जर’ लोक नाराज असल्याचे सांगण्यात येते. ‘पी.डी.पी.’ पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती, अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. गुलाम नबी आझाद यांच्या ‘डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ पक्षाचा, जम्मूमध्ये चांगला प्रभाव आहे. या पक्षाचे लोक कोणाला मतदान करणार हेसुद्धा बघावे लागेल.
 
काश्मीरमधून आपापले घरदार, शेतजमीन सोडून ९० च्या दशकात काश्मीरबाहेर पळून गेलेल्या काश्मीर पंडितांना, त्यांच्या वंशपरंपरागत घरदार, जमिनीचा मालकीहक्क परत मिळण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यातील अनेकजणांची मतदार म्हणून नोंदणी झालेली असली, तरी किती काश्मिरी पंडित या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे मतदानात भाग घेतील, हे बघावे लागेल.
अल्ताफ बुखारी यांच्या ‘अपनी पार्टी’ आणि सज्जाद लोन यांची ‘पीपल कॉन्फरन्स’ यांचा ,काश्मीरमधील मतदारसंघात अनेक ठिकाणी प्रभाव आहे. त्यामुळे, हे दोन्हीही पक्ष अब्दुल्ला यांचा नेशनल कॉन्फरन्स पक्ष आणि मेहबुबा मुफ्ती यांचा ‘पी.डी.पी.’ यांच्या किती मतदारांना स्वतःकडे खेचून घेऊ शकतात, हे बघणे उत्कंठावर्धक असेल, हे निश्चित.
 
काश्मीरमध्ये ‘बनिहाल’ या स्थानकापर्यंत भारतीय रेल्वे सुरू झाल्यानंतर, आणि एकंदरीतच सर्व विकासकामे सामान्य लोकांना दृष्टोपत्तीस येत असल्याने, त्याकडे लक्ष ठेवून व आपल्या भविष्याचा विचार करूनच मतदारांना मतदान करावे लागणार आहे. ज्या अनेक स्थानिकांना इतक्या वर्षांमध्ये मतदानाची संधी मिळाली नव्हती, ते अनेकजण मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. यामुळे, विकासकामांमुळे वाढत जाणार्‍या रोजगाराकडे दुर्लक्ष करून, स्वतःच्या धार्मिक कट्टरतेला चिकटून राहणारे कितीजण आहेत, हेसुद्धा या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. यापुढील काळातही जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधा, जलविद्युतप्रकल्प, पर्यटन व्यवसाय यावर केंद्र सरकारचे बारिक लक्ष असणार आहे. लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुकाही, या वर्षाच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे.
 
येणार्‍या काळात काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढत जाणार आहे. रोजगाराच्या अनेक संधी समोर येणार आहेत. त्यामुळे, स्थानिक यावर विचार करतीलच, अशी अपेक्षा आहे. तसेच, भारताचा शेजारी देश ज्याप्रकारे कंगाल झाला असून भिकेला लागला आहे, त्याचीही जाणीव काश्मीरमधील मतदारांना असावी, अशी अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. लडाख वेगळा केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर, उर्वरित जम्मू काश्मीरमधील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्व भारतीयांचे लक्ष आहे. भारताचे शेजारी देश पाकिस्तान, चीन तसेच अनेक पाश्चिमात्य देशांचे या निवडणुकीतील निकालाकडे लक्ष असणार आहे.
 
पाकिस्तानच्या ताब्यात असणारा काश्मीर हा येत्या काळात भारतात समाविष्ट होणे अपेक्षित आहे. पाकव्याप्त काश्मीरचा भूभाग आणि त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता बघता, तेथील लोकांसाठी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत अनेक जागा आत्तापासूनच राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. भारतात भौगोलिकदृष्ट्या समाविष्ट झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्येही निवडणूक घेऊन प्रतिनिधी निवडले जातील.
 
शुक्रवार, दि. १७ मे रोजी बारामुल्ला मतदारसंघाच्या ‘पट्टन’ येथे मोठी राजकीय सभा झाली, ज्यामध्ये ‘जम्मू आणि काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स’चे नेते सज्जाद गनी लोन यांनी, ’नॅशनल कॉन्फरन्स’ या राजकीय पक्षाचे नेते अब्दुल्ला घराण्यावर सडकून टीका केली होती. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाने इतक्या वर्षांमध्ये काश्मीरसाठी काय केले? याची यादी लोकांपुढे सादर करावी, असेही सज्जाद लोन म्हणाले होते.
 
आता काश्मीरमधील नव्या पिढीला बदल हवा आहे. तर दुसरीकडे ‘पी.डी.पी.’ पक्षाच्या मेहबुबा मुफ्ती यांनी गंदेर बाल येथे रोड शो करून भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती.जम्मू काश्मीर अपनी पार्टी या पक्षाच्या उमेदवारांकडे आणि त्यांना मिळणार्‍या मतांकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. काश्मीरमधील मार्तण्ड मंदिरासारख्या अनेक जुन्या ऐतिहासिक स्थळांचे पुनरुज्जीवन केले जाणार आहे. पुढील पाच वर्षांत जम्मू आणि काश्मीरचा चेहरामोहरा एकदम बदलून जाणार आहे, हे निश्चित.
-सनत्कुमार कोल्हटकर