प्रत्येक मंदिर न्यायालयीन लढ्यातून सोडवणारच! : अॅड. विष्णू शंकर जैन

    19-May-2024
Total Views |

vishanu
 
मुंबई  : "ज्ञानवापी ही केस आमच्यासाठी भक्तीचा एक मार्ग आहे. विरोधक त्यांची वास्तू सोडणार नाही, आपल्याला ते हिसकावूनही घ्यायचे नाही. अक्रांतांनी ज्या ज्या मंदिरांवर आक्रमणे केली ते प्रत्येक मंदिर आम्ही न्यायालयीन लढ्यातून सोडवणारच!", असा ठाम विश्वास हिंदू मंदिरांसाठी कायदेशीर संघर्ष करणारे वरिष्ठ अधिवक्ता अॅड. विष्णू शंकर जैन यांनी व्यक्त केला.
 
लोढा फाऊंडेशन आणि भारत मंथन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने लेखक आणि सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक डॉ. विक्रम संपत लिखीत 'प्रतीक्षा शिवाची : काशी-ज्ञानवापीच्या सत्याचा शोध' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न झाला. शनिवार, दि.१८ मे रोजी प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यासंकुल, सर भालचंद्र मार्ग, हिंदू कॉलनी, दादर (पू.) येथे सदर कार्यक्रम पार पडला.
 
डॉ. विक्रम संपत यांच्या 'वेटींग फॉर शिवा : अनर्थिंग ट्रुथ ऑफ काशीज् ज्ञावनापी' या इंग्रजी पुस्तकाचे ते मराठी भाषांतर आहे. कार्यक्रमाला स्वतः विक्रम संपत यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. तर विशेष अतिथी म्हणून अॅड. विष्णू शंकर जैन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व लेखक सुधीर जोगळेकर होते. यावेळी मूळ पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. प्राची जांभेकर यांनी दोन्ही अतिथींची विशेष मुलाखत घेतली.
 
विष्णू शंकर जैन यावेळी म्हणाले की, "हरी शंकर जैन यांना अनुभूती आली की, काशी विश्वनाथाला गुलामीच्या ढाच्यातून मुक्त करण्यासाठी ज्ञानवापीची केस लढावी. त्यामुळे केससंदर्भात रिसर्च सुरू झाला. ज्ञानवापी केवळ मंदिर नाही तर हिंदुंच्या आस्थेचे केंद्र आहे. ज्ञानवापी केस आणि ज्ञानवापी मंदिराविषयी एकूण एक मुद्दे या पुस्तकात जसेच्या तसे मांडले आहेत. १९ शे च्या काळापासून ते सद्यस्थिती पर्यंतच्या सर्व गोष्टींचा उल्लेख पुस्तकात आहे."
 
खोटं आणि अफवा पसरवणाऱ्या वामपंथी इतिहासकारांची मोठी पोलखोल विक्रम संपत यांनी केली. ते म्हणाले, बाबरी ढाच्याची भिंत जेव्हा कारसेवकांनी पाडली तेव्हा एक शिलालेख (९x५ फूट) खाली पडला. जो राम मंदिर पाडून बाबरी ढाचा उभारल्याची साक्ष देतो. इरफान हबीब नामक एका इतिहासकाराने तो शिलालेख कारसेवकांनी ठेवला, अशा अपप्रचार केला. तसेच ज्ञानवापी संदर्भातील खोट्या गोष्टी, अफवा गेली 75 वर्ष वामपंथी इतिहासकारांनी लोकांच्या मनावर बिंबवल्या. मात्र आता ज्ञानवापीचा खरा इतिहास व ज्ञानवापीबद्दल सांगणारे हे पुस्तक आपल्यासमोर आले आहे." काशीचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व, वाड्मयातील स्थान आणि अर्थातच काशीवर झालेले धर्मांध हल्ले आणि तरीही काशीचे पुन्हा उभे राहणे, कायदेशीर लढाया या सर्वांचे विस्तृत वर्णन या पुस्तकात केले आहे.
 
काशीसाठी महाराष्ट्राचे योगदान
महाराष्ट्र कर्नाटक लगतच्या चार ब्राह्मण परिवार काशीमध्ये स्थायिक होऊन त्यांनी काशीतील संपूर्ण पंचक्रोशी यात्रेचे वर्णन संस्कृत भाषेमध्ये लिहिले आहे. मुघलांपासून काशी मुक्त व्हावी हे स्वप्न छत्रपती शिवरायांनी सुद्धा पाहिले होते. मात्र काशी मुक्त झाली नाही याचे शल्य उरात बाळगून त्यांनी देह ठेवला. १७५५ मध्ये काशीमध्ये मंदिरे पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पुन्हा या ठिकाणी मंदिरे उभारली होती.