चीन-रशियात मैत्रीचे वारे

    19-May-2024   
Total Views |
 russia china
 
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. जागतिक राजकारणात हा नियम चपखल लागू पडतो. सध्या रशिया आणि चीन जवळ येत आहेत. पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या परदेश दौर्‍यासाठी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी, चीनची निवड केली होती. त्याचप्रमाणे, शी जिनपिंग यांनीही मार्च २०२३ मध्ये तिसर्‍या कार्यकाळात राष्ट्राध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर, पहिल्या परदेश दौर्‍यासाठी रशियाची निवड केली होती. यावरून दोन्ही देशांतील संबंध कसे असतील, याची प्रचिती येते. मुळात, चीन-रशिया एकमेकांच्या जवळ येण्यामागे काय कारणे आहेत, त्यामुळे जागतिक स्तरावर व प्रामुख्याने भारतावर काय प्रभाव पडेल, हे जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.
 
चीनची सीमा दहा देशांना लागून असून, सर्वात जास्त शेजारी राष्ट्र असलेला देश म्हणून चीनकडे पाहिले जाते. मात्र, सर्व देशांशी चीनचे संबंध चांगलेच आहेत, असे नाही. कित्येक शेजारी राष्ट्रांशी चीनचे वाद आहेत. १९५० साली चीन आणि सोव्हिएत संघ यांच्यात मैत्री, सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. आता या मैत्रीसंबंधांना नवे वळण मिळाले आहे. सोव्हिएत संघाकडून ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ला मान्यता देण्यास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आयोजित विशेष सोहळ्यात व्लादिमीर पुतीन सहभागी झाले. यावेळी पुतीन आणि जिनपिंग यांच्यात सैन्यशक्ती, नवीकरणीय ऊर्जास्रोत, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि द्विपक्षीय व्यापार या मुद्द्यांवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या संबंधांवर नजर टाकली, तर रशिया-युक्रेन युद्धानंतर दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. युक्रेन युद्धादरम्यान, पश्चिमी देशांनी प्रतिबंध घातल्यानंतर चीनने रशियाची बरीच मदत केली. युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारात सुधारणा झाली आहे. २०२१ साली चीन आणि रशियात १४६.९ दशलक्ष डॉलर्सचा व्यापार झाला. तो वाढून २०२२ साली १९०.३ दशलक्ष डॉलर्स आणि २०२३ साली २४०.१ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचला.
 
सध्या चीन-रशिया यांच्यातील भागीदारीत, रशिया हा ज्युनिअर पार्टनर बनत चालला आहे. चीन रशियाला शस्त्रास्त्रे पुरवित आहे, तर दुसरीकडे चीन रशियाकडून प्राकृतिक गॅसची आयात करत आहे. रशियाच्या यमलपासून मंगोलियामार्गे एक पाईपलाईन चीनला जाणार असून, दुसरी सर्वात जास्त लांबीची गॅस पाईपलाईन असेल. याला ’पॉवर ऑफ सायबेरीया-२’ असे नाव दिले गेले आहे. रशियासोबत चीन ऊर्जा भागीदारी करून ऊर्जा क्षेत्राला आणखी मजबूत करू पाहतो आहे. अशा अनेक कारणांमुळे चीन-रशिया संबंध दृढ होत आहेत. युक्रेन-रशिया युद्धानंतर चीन रशियाला जाहीर समर्थन करीत नाही. मात्र, विरोधदेखील करीत नाही. दोन्ही देशांचा शत्रू एकच आहे, तो म्हणजे अमेरिका. अमेरिकेचा वैश्विक स्तरावर सामना करण्यासाठी दोन्ही देश एकत्र आले आहेत.
 
चीन-रशियाच्या मैत्रीमुळे भारताला तसा फारसा फरक पडणार नसला, तरीही काहीसा प्रभाव पडू शकतो. चीन भारतासोबत रशियाचे संबंध सीमित करू शकतो. दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्यावरही, चीन आपली वाकडी नजर टाकू शकतो. कारण, रशियासाठी संरक्षण सहकार्याच्या दृष्टिकोनातून चीन भारतापेक्षाही मोठा ग्राहक आहे. याच कारणामुळे, रशिया अत्याधुनिक संरक्षण साहित्य, शस्त्रास्त्रे भारताला देत नाही. यात सुखोई-३५ लढाऊ विमाने यांचा समावेश आहे. दरम्यान, चीनला दिल्यानंतर भारतालाही ’एस-४०० सिस्टीम’ रशियाने दिली होती. रशिया-भारताद्वारे संयुक्तरित्या विकसित ब्राह्मोस मिसाईलला कोणालाही निर्यात केले नाही, तेसुद्धा, जेव्हा अनेक देश खरेदीसाठी इच्छुक आहेत. जो देश चीनविरोधात मिसाईलचा वापर करू शकतो, अशा देशांना निर्यात करण्यास रशिया इच्छुक नाही. दोन्ही देश मैत्री संबंधांना नव्या उंचीवर नेऊ पाहात आहेत. एकमेकांना सहकार्य करून वैश्विक राजकारणात चीन-रशिया आपले हित साधत आहेत. भारत-रशिया संबंध आधीपासून दृढ आहेत. त्यावर अमेरिकेचाही परिणाम झाला नव्हता आणि चीनचा फार फरक पडेल, असे वाटत नाही. भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे, त्यामुळे, भारताला कोठे जाण्याची गरज नाही. उलट, भारताकडे येण्यासाठी इतर देशांची रांग लागेल.
७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.