रत्नागिरी: डिंगणीमध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत

    18-May-2024
Total Views |

leopard cub
मुंबई (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीतील संगमेश्वर येथील चाळकेवाडी रस्त्याजवळ एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. शुक्रवार दि. १७ मे रोजी सकाळी ८ वाजता डिंगणी येथील पोलीस पाटील मोहिते यांना हा बिबट्या आढळला असून त्यांनी या संबंधीची माहिती तात्काळ वनविभागाला कळवली.

संगमेश्वरचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली, मिळालेल्या माहिती प्रमाणे हा बिबट्या मृतावस्थेत पडलेला असल्याची दिसून आले. यासंबंधी रत्नागिरीचे वनअधिकारी यांना माहिती देण्यात आल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार यांनी मृत बिबट्याची पाहणी केली. या पाहणीमध्ये मृत बिबट्या मादी असून ३ ते ४ महिन्यांचा बछडा असल्याचे समजले. मृत बछड्याच्या मानेवर दाताच्या खोल खुणा असलेल्या आढळल्या असून जखमेतून रक्त मिश्रित पाणी वहात असल्याचे दिसून आले. तसेच पुढील पायाच्या वरील भागावर जखम होती. त्यानुसार सदर बिबट्याचा मृत्यू जंगली वन्यप्राण्याच्या हल्ल्यात झाला असावा असे सांगण्यात आले आहे. मृत बिबट्याची मोजमापे घेऊन पंचनामा करून बिबट्याचे शव ताब्यात घेतले गेले तसेच देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी युवराज शेट्ये यांनी शवविच्छेदन केले.

या कार्यवाहीमध्ये विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर वनपाल तौफिक मुल्ला, वनरक्षक आकाश कडूकर, सहयोग कराडे यांचा समावेश होता.