संत सेना महाराजांचे रामदर्शन

    18-May-2024
Total Views |
Sant Sena Maharaj

संत सेना महाराज हे नाभिक समाजातील साक्षात्कारी संत होते. संत ज्ञानदेवांचा गुरू म्हणून त्यांनी गौरव केलेला आहे. त्यांचे मराठीत 262 आणि हिंदीत 52 पदे उपलब्ध आहेत. ’सैन सागर’ हा त्यांचा हिंदी पदसंग्रह प्रसिद्ध आहे. हिंदीतील संत रविदास, संत धन्ना यांनी सेना महाराजांचा विशेष उल्लेख केलेला आहे. पंढरपूरमध्ये त्यांचा मठ असून मध्य प्रदेशात ’सैन पंथ’ आहे. ते विठ्ठलाप्रमाणे रामाचेही थोर भक्त होते.
 
ईश्वरापुढे माणूस इथून-तिथून एक आहे, समान आहे. ना कोणी श्रीमंत - ना गरीब, ना उच्चवर्णीय ना शूद्र अशी जातिनिरपेक्ष, समतेची अध्यात्मदृष्टी ज्या संतांनी जोरकसपणे पुरस्कारली, त्यामध्ये संत ज्ञानदेव-नामदेवांच्या प्रभावळीतील संत सेना महाराज हे एक अग्रणी संत होत. एवढेच नव्हे, तर उत्तर भारतातील थोर संत रामानंदांच्या प्रमुख 12 शिष्यांपैकी एक म्हणून संत सेना महाराजांची उत्तरेमध्ये ’संत सैन’ अशी नाममुद्रा प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे उत्तरेत व दक्षिणेत ज्याचे कार्य झाले ते संत सेना - सैना हे आंतरभारतीचे एक उदाहरणच आहे. त्यामुळे संत सेना एक की दोन असा वाद पण आहे.

 
मध्य भारतातील (म.प्र.) ’बांधवगड’ हे संत सेना महाराजांचे मूळ गाव म्हणून परिचित आहे. त्याच्या नावे ’सेन पंथ’ आजही मध्य प्रदेशमध्ये दिसून येतो. त्यांचा प्रभाव मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या प्रमाणे राजस्थानमध्येही दिसतो. संत रविदास, संत धन्ना (जाट) यांनी सेना महाराजांचा त्यांच्या काव्यात उल्लेख केलेला आहे. तसाच मराठीत संत जनाबाई व संत चरित्रकार महिपती यांनीही सेना महाराजांचा उल्लेख केलेला आहे. सेना महाराजांनी ज्ञानदेवांना गुरुस्थानी विराजमान केलेले आहे. ’सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान।’ ’ज्ञानदेव गुरू ज्ञानदेव तारू।’ या रचना त्याचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे, शिखांच्या ’गुरुग्रंथसाहेब’मध्ये संत नामदेवांप्रमाणेच संत सेनांचीही एक अभंगरचना समाविष्ट आहे. ही त्याची थोरवी आहे.
 
सेना महाराजांचे मराठीत 262 अभंग, तर हिंदीत 52 पदरचना उपलब्ध आहेत. आपले महाराष्ट्रातील कार्य करून ते काशीला गेले. रामानंदांच्या शिष्यांमध्ये त्यांनी स्थान प्राप्त केले. संत नामदेवांनंतर उत्तर भारतातही कीर्ती मिळवणारे संत सेना हे दुसरे मराठी संतकवी होते. त्यांच्या ’राम’पर मराठी व हिंदी दोन्ही रचना आहेत. मराठीत ते सगुण भक्ती पुरस्कारतात, तर हिंदीत निर्गुण भक्ती करताना दिसतात. ’मुखी रामनाम उच्चारी। सेना म्हणे निरंतरी।’ हा त्याचा एक अभंग विशेष प्रसिद्ध आहे.
 
उठा उठा सकळीक घ्या रामनाम।
पूर्ण होय काम सत्य मान ॥ 1 ॥
राम नामे तरले सागरी दगड।
विष प्राशिले अन्न होय आदिनाथा।
रामनाम जपता शांती होय।
 
या अभंगात समुद्रमंथनातील विषाचा भगवान शंकरांनी स्वीकार केला, पण त्यांच्या देहाचा दाह झाला तो रामनामाने शांत झाला, असा एक पौराणिक कथेचा संदर्भ देऊन रामनामाचे महत्त्व सेना महाराज पटवून देतात आणि शेवटी रामनामाने असंख्य भक्त तरल्याचेही सांगतात.
सेना म्हणे नामे तरले असंख्य।
म्हणा सर्वामुखी राम राम ॥4॥
 
आणि ’रामे अहिल्या उद्धरली। रामे गणिका तारिली ॥ 1॥’ अशा दोन अभंगांतून सेना महाराजांनी रामनामाचे माहात्म्य गायिलेले आहे. थोडक्यात, संत सेना महाराजांनी गायलेली रामस्तुती ही रामपरब्रह्म, राम आराध्यदेवता अशा भक्ती पंथीय वळणाची आहे. हिंदी काव्यातील ’राम’ दर्शन संत सेना यांची हिंदी, मारवाडी, पंजाबी अशा अनेक भाषेमध्ये पदरचना, काव्य उपलब्ध आहे. ’राम नाम मै नाई-जन तेरा।’ या ओळीने प्रारंभ होणार्‍या एका पदामध्ये आपण नाभिक-न्हावी (नाई) समाजातील आहोत, पण हे राम मी तुझाच आहे, असा भाव व्यक्त करीत दाढी, मुछे, आरसा, तेल, कैची अशा स्वतःच्या धंद्यातील वस्तूच्या प्रतिमा वापरत, त्यांनी हे पद रचलेले आहे. असेच एक पद त्यांनी मारवाडी भाषेत लिहिले आहे. त्या पदात ते म्हणतात, ’सेना ऐसी खिजमत कीजे, जिद म्हारो राम पतीजे।’ ’गुरु ग्रंथसाहेब’ या शिखांच्या परमपवित्र धर्मग्रंथामध्ये सेना महाराजांचे पंजाबी भाषेतील पद समाविष्ट आहे. ते पद नसून आरती आहे.
 
धूप दीप घृत साज आरती,
वारणे जाऊ कमलापती॥
मंगलहार मंगला नित्य मंगल, राजा राम राव को।
 
या आरतीमध्ये रामाचा उल्लेख ’राजा’, ’राव’ अशा विशेषणांनी केलेला आहे. त्यातून त्यांचा प्रभू रामाविषयीचा भक्तिभाव व्यक्त होतो. राम नाम हे नित्य मंगल आहे असे ते म्हणतात.संत सेनाजींनी हिंदीमध्ये कबीर-रविदास संवादात्मक एक 19 कडव्यांचे पद लिहिलेले आहे. अभ्यासकांना संत सेनाजींची ही रचना महाराष्ट्रातील धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिराच्या संदर्भ बाडामध्ये सापडली आहे, हे विशेष. या काव्यरचनेत कबीर व रविदासमध्ये श्रीरामाच्या सगुण व निर्गुणरूपाबद्दल वाद-संवाद, प्रश्नोत्तरी आहे. कबीर रामाच्या निर्गुण उपासनेचे तर रविदास सगुण उपासनेचे प्रतिपादन करतात आणि शेवटी रविदासांना कबीरांचे रामाच्या निर्गुण उपासनेचे महत्त्व मान्य होते, असा काहीसा या पदाचा आशय आहे. संत सेनाजीचा ’सैन सागर’ नावाचा पदसंग्रह आहे. त्यात 52 पदे आहेत. त्या रचनांमध्ये प्रभू रामाचे पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतात.
 
हरि की सिफत करू दिनराती
रामनाम करू जपु परभाती।
 
काही काव्यरचनांमध्ये संत सेनाजींनी श्रीराम व श्रीकृष्ण यांच्यातील एकता, एकरूपता प्रतिपादन केलेली आहे. रामनाम जप व रामनाम स्मरण यावरच त्यांचा भर आहे, असे एकूण काव्यातून दिसते. ’सैन सागर’ पदसंग्रहातील एका पदात संत सेनाजींनी चार चरणांमध्ये परशुराम व राम दोघांचे गुणगान केलेले आहे. ते पद असे-
 
प्रसराम भऐ अवतारा।
छत्री मार जगत वस कीना ॥1॥
तब ही राम भैई अवतारा।
रावण को मारे करतारा ॥2॥
श्रीरामावर ठाम विश्वास ठेवा हा त्यांचा एकूण उपदेश आहे.
रख भरोसा राम पर।
॥जय श्रीराम॥
 
 

 
विद्याधर ताठे
 
 
(पुढील अंकात : संत एकनाथांचा ’नित्यविजयी रघुनंदन’)