५ लाख शेतकऱ्यांच्या मदतीने तयार झालेल्या ‘मंथन’ चित्रपटाचे Cannes मध्ये खास स्क्रिनिंग

    18-May-2024
Total Views |
smita patil  
 
 
मुंबई : फ्रान्समध्ये ७७ वा ‘कान्स चित्रपट महोत्सव’ (Cannes Film Festival) सुरु आहे. जगभरातील विविध चित्रपट हा महोत्सवात दाखवले जात असून यात ५० वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटाने बाजी मारली आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाचे ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त नुकतेच खास स्क्रिनिंग करण्यात आले. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका होती आणि चित्रपटाची विशेष बाब म्हणजे ५ लाख शेतकऱ्यांनी जमा केलेल्या पैशांतून हा चित्रपट साकारण्यात आला होता.
 
‘मंथन’ हा चित्रपट भारतातील श्वेतक्रांतीचे जनक अशी ओळख असलेल्या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दूध सहकारी चळवळीवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती गुजरात को- ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (GCMMF) दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. विशेष म्हणजे ‘मंथन’ हा लोकवर्गणीतून निर्मिती करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. जवळपास पाच लाख शेतकऱ्यांनी या चित्रपटासाठी प्रत्येकी दोन रुपये दान केले होते.
 
‘मंथन’ या चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर आणि डॉ. कुरियन यांनी लिहिली होती. तर स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, कुलभूषण खरबंदा, मोहन आगाशे, अनंत नाग आणि अमरीश पुरी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका होत्या. १९७६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला १९७७ साली सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. याशिवाय सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी विजय तेंडुलकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आणि आनंदाची बाब म्हणजे १९७७ साली भारताने ऑस्करसाठी हा चित्रपट पाठवला होता. तसेच, ‘कान्स’ मधून परतल्यावर भारतातील ४० शहरांमध्ये ‘मंथन’ चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा विचार देखील सुरू आहे.
 
smita patil  
 
श्याम बेनेगल दिग्दर्शित मंथन या चित्रपटाचे चित्रिकरण गुजरातच्या सांगनवा या खेडेगावात करण्यात आलं होतं. याठिकाणी शूटिंग करताना कलाकारांना ४० ते ४५ दिवस तेच कपडे घालण्यास सांगितलं होतं. तसेच, ज्या भागात चित्रिकरण करण्यात आलं तिथे पाण्याचा तुटवडा होता, ग्रामस्थ बरेच दिवस आंघोळ न करता राहायचे, त्यामुळे नसीर, स्मिता, गिरीश, अमरीश व इतरांना सांगितलं हेच कपडे वापरायचे. जर कपड्यांमधून दुर्गंधी आली, तर ती सर्वांच्याच कपड्यांमधून येईल, अशी चित्रपटाबद्दलची आठवण श्याम बेनेगल यांनी सांगितली होती. देशातील यशस्वी सहकारी चळवळीवर बेतलेल्या मंथन चित्रपटात दूध उत्पादन आणि दूध गोळा करण्याची क्रांती दाखवण्यात आली आहे.