इंडिगोची २०२६पर्यंत एअर टॅक्सी चालविण्याची योजना

18 May 2024 19:28:44

archer


मुंबई, दि.१८: प्रतिनिधी  
भारतात आज वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहे. इतकेच नाहीतर सरकार आणि खासगी भागीदारीतूनही अनेक प्रकल्पांना गती आहे. याच पार्श्वभूमीवर आता चर्चा सुरु आहे टी भारतातील पहिल्या फ्लाईंग टॅक्सीची कशी असेल ही टॅक्सी पाहूया.
ही इलेक्ट्रिक टेक ऑफ आणि लँडिंग विमाने आहेत. जे वाहतूक आणि परिवहनातील एक प्रगत तंत्रज्ञान आणि नवकल्पनापैकी एक आहे. जे एका सरळ रेषेत उड्डाण घेतात आणि पुन्हा जमिनीवर उतरविले जातात. यालाच फ्लाईंग टॅक्सी असेही म्हणतात. या टॅक्सीमध्ये एकावेळी सहा माणसे प्रवास करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की यात आणि हेलिकॉफ्टरमध्ये फरक काय? तर आहे..फरक आहे तो असा की या टॅक्सीद्वारे प्रवासाची किमंत ही एका खासगी चॉपरच्या तुलनेत अगदीच कमी असेल. आणि या विमानांना उतरण्यासाठी आणि उड्डाण घेण्यासाठी खूप कमी जागा लागते. महत्वाचे म्हणजे भारताच्या भविष्यातील प्रगत वाहतूक व्यवस्थेसाठी ही विमान शहरी दळणवळणात क्रांती घडवून आणणारी असतील.

आगामी काळात इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एंटरप्रायझेस आर्कर या कॅलिफोर्नियास्थित कंपनीच्या बरोबरीने भारतात अशा फ्लाईंग टॅक्सी चालविण्याची महत्वाकांक्षी योजना आखत आहे. २०२६पर्यंत भारतात या टँक्सी चालविल्या जातील असे प्रयत्न इंडिगोच्या माध्यमातून सुरु आहे. या टँक्सी भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली येथील कॅनॉट प्लेस ते गुरुग्राम चालविण्याची योजना आहे. सद्यस्थितीमध्ये कॅनॉट प्लेस ते गुरुग्राम हे अंतर रस्तेमार्गे पार करण्यासाठी साधारणत: ६० ते ९० मिनिटे वेळ लागतो. मात्र या फ्लाईंग टॅक्सीमुळे हा वेळ ७ मिनिटांवर येईल असा अंदाज आहे. याप्रवासासाठी २ ते ३ हजारांचा खर्च येईल. हा खर्च एका चॉपरच्या प्रवासाच्या तुलनेत कमी खर्चिक आणि अधिक सुरक्षित असल्याचे आर्कर या ही विमान बनविणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतात पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथे ही सेवा सुरु केली जाईल. ही विमाने पूर्णतः इलेक्ट्रिक असल्याने यात सहा बॅटरी असतात. ज्या पूर्ण चार्ज करण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी लागतो.


प्रकल्पाची सद्यस्थिती


कोणताही प्रकल्प सुरु होण्यापूर्वी त्या प्रकल्पाची सुरक्षितता जाणून घेतली पाहिजे. व्यावसायिक संचलनासाठी आर्कर युनायटेड स्टेट्समधील फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (FAA) कडून मंजुरी मिळवण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. कंपनीला पुढील वर्षी या मंजुऱ्या मिळतील अशी अपेक्षा आहे, त्यानंतर ही कंपनी भारतात मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करेल. ॲडम गोल्डस्टीन यांनी एका माध्यम संस्थेला सांगितले की, नियोजित व्यावसायिक लाँच होण्यापूर्वी पुढील वर्षी भारतात इलेक्ट्रिक एअर टॅक्सीच्या चाचण्या सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. भारतात हा प्रकल्प सुरु करण्यासाठी २०० एअर टॅक्सीची आवश्यकता असेल. आर्कर सद्यस्थितीत भारतातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अभ्यास करते आहे. या टॅक्सी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आणण्यासाठी लागणाऱ्या सुविधा, रूफ टॉफ उड्डाण आणि संचलनसाठी लागणारी व्यवस्था, बस स्थानके, रेल्वे स्थानके याठिकाणी कस्टम व्हर्टी पोर्ट यांसारख्या सुविधा उभारण्यावर विचार करत आहे. इतकेच नाही तर काही भारतीय कंपन्या आणि स्टार्टअपदेखील आज फ्लाईंग टॅक्सी सारख्या सुविधा उभारण्यासाठी लागणारी विमान तयार करण्यासाठी काम करत आहेत. कमी जागेत सपाट पृष्ठभागावर उतरविण्यास सक्षम असा पर्याय देण्यासाठी फ्लाईंग टॅक्सी सक्षम आहेत. हा महत्तवाकांक्षी प्रकल्प भारतातील वाहतूक क्षेत्रात कृती घडविणारा असला तरी सद्यस्थितीत सुरक्षितता प्रमाणपत्रे प्राप्त होण्यावरच या प्रकल्पाचे भविष्य अवलंबुन आहे.
Powered By Sangraha 9.0