स्वतंत्र अर्थव्यवस्थाच असलेल्या मंदिरांसाठी योग्य व्यवस्थापन गरजेचे : डॉ. रविकांत सांगुर्डे

    18-May-2024   
Total Views |
Ravikant Sangurde

 
भारत हा मंदिरांचा देश. या मंदिरांना केवळ धार्मिक-आध्यात्मिक महत्त्व नाही, तर ही मंदिरे आज देशाच्या अर्थव्यवस्थेचा देखील एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र, तरीही व्यवस्थापनाच्या बाबतीत ही मंदिरे काहीशी दुर्लक्षितच. तेव्हा या धर्तीवर मुंबई विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासक्रम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू अध्यासन केंद्र यांच्या पुढाकारातून साकार होत असलेला हा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि त्याचे शैक्षणिक पटलावर काय परिणाम होतील, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने ‘सेंटर फॉर हिंदू फिलोसॉफिकल स्टडी’चे संचालक आणि फॅकल्टी ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे असोसिएट डीन डॉ. रविकांत बाळकृष्ण सांगुर्डे यांच्याशी याविषयी केलेली ही खास बातचीत...
 
हा अभ्यासक्रम तयार करताना नेमक्या कोणकोणत्या बाबींचा खोलवर जाऊन विचार केला? ती संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी होती?

मंदिर व्यवस्थापन कोर्स सुरू करावा, ही योजना पुढे आली आणि ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट’मध्ये गेले एक वर्ष सतत आमच्या बैठका होत होत्या. सुरेश हावरे, माजी कुलगुरू सुहास पेडणेकर, ‘टेम्पल कनेक्ट’चे गिरीश कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रताप लाड, अतुल जोग, असे आम्ही सर्वजण या प्रकल्पासाठी जमत होतो. भारतात मंदिरे फार आहेत. मुळात भारत हा मंदिरांचाच देश. मंदिरांत नेहमीच गर्दी असते. रांगाही फार लागतात. आजकाल तर नवनवीन उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा होतात. तेव्हा या सर्व मंदिरांसाठी योग्य व्यवस्थापन गरजेचे वाटते. आज मंदिरातून बरेच आर्थिक व्यवहार होतात. ही एक स्वतंत्र अर्थव्यवस्थाच आहे. मंदिरात येताना कुणी हात हलवत येत नाही, भेट आलेल्या नारळाचे काय करावे, ओटी लुगड्याचे काय करावे? दागिने, निर्माल्याची विल्हेवाट कशी लावावी? असे अनेक प्रश्न असतात. मग निर्माल्यापासून अत्तर बनवता येईल का? हे कोण शिकवू शकेल, अशा अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. अगरबत्त्या बनवणे, दानपेटीतील पैसे केवळ बँकांमध्ये न ठेवता त्याचे चलनवलन सुरू ठेवून अर्थव्यवस्था प्रवाही कशी ठेवता येईल आणि त्यातून भाविकांना कसे फायदे करून देता येतील, अशा अनेक मुद्द्यांवर चर्वितचर्वण झाले. यासाठी डॉ. माधवी नरसाळे यांना ‘कोऑर्डिनेटर’ म्हणून नेमले आहे. हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकाराने ‘टेम्पल कनेक्ट’ सोबत या अभ्यासक्रमाचा विचार करतोय. आजघडीला कीर्तनशास्त्र, हिंदूशास्त्र, भगवद्गीतेवर दोन सर्टिफिकेट कोर्सेस विद्यापीठात आहेत.
 
अभ्यासक्रमांमध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर प्रशिक्षण मिळेल, याबद्दल काही सांगू शकाल? तसेच यासाठी विद्यार्थ्यांकडून किती शुल्क आकारले जाईल?
 
हा अभ्यासक्रम तीन वेगवेगळ्या कोर्सेसद्वारे डिझाईन केलेला आहे. यात प्रमाणपत्र, डिप्लोमा आणि डिग्री कोर्स अंतर्भूत केलेले आहेत. सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र प्राप्त होते, एक वर्षांचा पूर्ण केल्यास डिप्लोमा प्राप्त होतो, तर दोन वर्षे संपूर्ण कोर्स पूर्ण केल्यास पदवी प्रदान केली जाईल. प्रत्येक सहामाही अभ्यासक्रमात तीन महिन्यांचे ट्रेनिंग अपरिहार्य आहे. तीन महिने अभ्यास तर तीन महिने कोणत्या एका मंदिरात काम करून त्याच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.तसेच एक महत्त्वाचा मुद्दा यावेळी अधोरेखित कारावास वाटतो की, फक्त मंदिर नाही तर जैन मंदिर, बुद्ध विहार, गुरुद्वार आणि चर्च यांचे व्यवस्थापन कसे करावे, याचेही धडे या अभ्यासक्रमात दिले जातील. अगदीच मशिदीचा सुद्धा अंतर्भाव करता येईल, तशी मागणी असल्यास. तुम्ही शुल्काबाबत विचारलेत, पण त्याबाबत निर्णय अजूनही विचाराधीन आहे. सध्या या कोर्ससाठी कोणतेही आर्थिक पाठबळ नसल्याने मुलांनीच स्वतःच्या हिमतीवर प्रवेश घ्यायचा आहे. हा ‘सेल्फ फायनान्सड कोर्स’ असेल. मात्र, याचे शुल्क जितके कमी ठेवता येईल तेवढे कमी असावे, असा आमचा विचार आहे. पुढील काही वर्षांत मात्र हा कोर्स नाममात्र शुल्कासहित उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.
 
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या काय संधी उपलब्ध होऊ शकतील? त्या संधी कशाप्रकारच्या असतील?

 
भारतात मंदिरे मोठ्या प्रमाणावर आहेत. पुढील काळात या मंदिर व्यवस्थापन कोर्सला बरकत येईल. आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध कराव्या लागणार नाहीत. कारण, मंदिरे नव्याने बांधावयाला लागणार नाहीत. ती आहेतच. मात्र, त्या मंदिरांच्या व्यवस्थापनाची गरज मात्र निर्माण होणार आहे. आज अशी कित्येक मंदिरे ट्रस्टींकडे आहेत. परंतु, बर्‍याच ट्रस्टींना वेळ मिळत नसल्याकारणाने एखादा पुजारी सर्व व्यवस्था पाहण्यास ठेवला जातो. त्यातून सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर होत नाही. त्यामुळे संधीची कमतरता नक्की नसेल.
 
एखाद्या आस्थापनेचे व्यवस्थापन हाताळणे आणि मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणे, यामध्ये नेमका काय फरक आहे? आणि हा अभ्यासक्रम तयार करताना याची विशेषत्वाने कशी काळजी घेतली आहे?
 
व्यवस्थापन काम म्हणजे काय? नफा आणि तोट्याचा विचार इतर आस्थापनांसारखा इथे केला जाणार नाही. मुळात भाविकांनी मंदिरात अमुक अमुक आणावे, असे आपण त्यांना सांगत नाही. तेव्हा उपलब्ध असलेल्या द्रव्यातून काय करता येईल, हे पाहावयाचे आहे. पूर्वनियोजन करता येणे तितकेसे शक्य नाही. तसेच महत्त्वाचे म्हणजे, हा काही ‘बिझनेस’ नाही, जिथे नफा डोळ्यासमोर ठेवून मेहनत घ्यावी लागेल. हा इतका आणि एवढाच फरक आहे.
 
मुंबई विद्यापीठाअंतर्गत कोणकोणत्या महाविद्यालयांमध्ये हा कोर्स शिकवला जाईल? मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त इतरत्र कोठे अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या योजना आहेत का?
 
सध्या ‘सेंटर फॉर हिंदू स्टडी’च्या विभागातच सुरु होणार आहे. महाविद्यालयांची एक प्रक्रिया असते. एखाद्या महाविद्यालयाला एखादा कोर्स हवा आहे आणि तो मुंबई विद्यापीठात असेल, तर एक अधिकृत प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेद्वारे अर्ज करुन कोर्ससाठी विनंती केली जाते. तसे अर्ज अजून प्राप्त झाले नाहीत. मात्र, झाल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. इतर विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ आणि ‘वेलिंगकर इन्स्टिट्यूट’ हा कोर्स सुरु करणार आहेत. भविष्यात इतर विद्यापीठेही या कोर्सची मागणी करतील, यावर आमचा विश्वास आहे.
 
 
यानिमित्ताने मंदिर व्यवस्थापनाचे नियम, कायदे यामध्ये नेमके काय बदल सरकारने करावे, असे आपल्याला वाटते? तसेच सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
 
 
सध्यातरी हा ‘सेल्फ फायनान्सिंग’ अभ्यासक्रम आहे. आम्ही सरकारी अनुदानाची मागणी केलेली नाही. मात्र, पुढील काळात कोर्स व्यवस्थित सुरु झाल्यावर अनुदानासाठी मागणी करण्याचा विचार आहे. या अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी धनिकांची मुलं येतील, अशी शक्यता फारच कमी आहे. परंतु, तरीही हा अभ्यासक्रम केवळ कोण्या एका वर्गासाठी मर्यादित नाही. याविषयी शिक्षण घ्यायचे अधिकार सर्वांनाच आहेत. मात्र, भविष्यात सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत प्राप्त झाली, तर अनेक गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
 
या अभ्यासक्रमात कोण कोण नेमके सहभागी होऊ शकते आणि यानिमित्ताने जे इच्छुक असतील त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
 
 
आजकालचे युग असे आहे की, ज्यात लोक पैसे कमावतात. आपले मानसिक संतुलन उत्तम ठेवण्यासाठी काही न काही करत असतात. आजच्या काळात तरुणांपासून वृद्धांपर्यंत वैफल्य आणि आत्महत्या त्यात लोक हरवलीयेत. लोकांना गण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे, जगण्याची कला उमगत नाही. जगणेच विसरून गेले आहेत. अशात मंदिरे म्हणजे श्रद्धास्थाने आपल्याला जगायला कारण देतात. त्या अशा स्थानिक महत्त्वाच्या केंद्रांचा विकास व्हायला हवा. मंदिरांच्या माध्यमातून इतकी वर्षे खंडित झालेली ही परंपरा पुनरुज्जीवित होईल. म्हणूनच या नव्या क्षेत्राकडे सकारात्मकतेने पाहा असे मी म्हणेन. आवड असणारे कोणीही या कोर्ससाठी सहभाग नोंदवू शकते, त्यास कशाचीच बंधने नाहीत.
 
 
 

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.