करधारकांच्या २४ मालमत्तांवर बीएमसीकडून टाच

१८० कोटी रुपयांचा कर थकविणाऱ्यांवर कारवाई

    18-May-2024
Total Views |

BMC


मुंबई, दि.१८ : प्रतिनिधी 
मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने २४ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण चार जेसीबी, एक पोकलेनसह विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्य जप्त करण्यात आले. तर, वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेला ३५.९४ कोटी रुपयांचा करभरणा करण्यासाठी ४८ तासांच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली आहे.

दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले. तथापि, देय दिनांक जवळ येऊनही करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई, डी, जी दक्षिण, पी उत्तर, एच पूर्व, एम पश्चिम, एम पूर्व, एफ उत्तर या विभागांमधील करधारकांच्या मालमत्तांवर मुंबई महापालिकेने अटकावणीची कारवाई केली आली. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी कर भरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. कारवाई झालेल्या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.


१) एच पूर्व - जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेडचे कास्टिंग यार्ड - ८० कोटी रुपये
२) वरळी - शुभदा गृहनिर्माण संस्था - ३५.९४ कोटी, कर भरण्यासाठी ४८ तासांची मुदत
३) रेनिसन्स ट्रस्ट ६.७२ कोटी - चार जेसीबी आणि एक पोकलॅन जप्त.
४) जी दक्षिण - न्यू शरीन टॉकीज- ६ कोटी ४७ लाख - लिलावाची नोटीस जारी
४) मालाड - शांतिसागर रिॲल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे भूखंड - १.६५ कोटी रुपये
५) लोक हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे भूखंड - ३.९१ कोटी
६) चेंबूर - जी. ए. बिल्डर्सचे भूखंड - १.०५ कोटी रुपये
७) फ्लोरा अव्हेन्यू - व्यावसायिक गाळे - ९२.४२ लाख रुपये
८) अरिहंत रिॲल्टर्सचे भूखंड - १.९६ कोटी रुपये
९) ई विभाग - मेसर्स प्रभातचा व्यावसायिक गाळा - ७२ लाख.
१०) हेक्स रिॲल्टर्सचा व्यावसायिक गाळा - १.१२ कोटी रुपये
११) मालवणी - डॉटम रिॲल्टीचे भूखंड - १३.०६ कोटी रुपये
१२) मालाड - क्रिसेंट आदित्य रिॲल्टर्स प्रा. लि.चा भूखंड - २.५० कोटी
१३) एच पूर्व - एन. जे. फिनस्टॉक प्रा. लि.चा व्यावसायिक गाळा - ४५.८३ लाख रुपये
१४) पी उत्तर - समर्थ डेव्हलपर्सचा भूखंड - २.३१ कोटी
१५) अजंता कर्मवीर ग्रुपचा भूखंड - २.०५ कोटी रुपये
१६) डी विभाग - श्रीनीजू इंडस्ट्रीजचे व्यावसायिक गाळे - ३.७७ कोटी
१७) एम पश्चिम - नेत्रावती गृहनिर्माण संस्थेचे भूखंड - ६७.५१ लाख
१८) विजया गृहनिर्माण संस्थेचे भूखंड - १.६८ कोटी रुपये
१९) जयश्री डी. कावळे - १.६५ कोटी
२०) ई विभाग - सय्यद अकबर हुसैन यांचा व्यावसायिक गाळा - ५८.१३ लाख रुपये
२१) एफ उत्तर - बी. पी. टेक्नो प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांचे व्यावसायिक गाळे - ४१.०५ लाख
२२) ओसवाल हाइटस्चे व्यावसायिक गाळे - २६.४८ लाख रुपये