‘छायासुंदरी’: ईशान्य भारतातून टाचणीच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

    18-May-2024
Total Views |

damselfly


मुंबई (विशेष प्रतिनिधी):
ईशान्य भारतातील मेघालय आणि अरूणाचल प्रदेश या दोन राज्यांमधून टाचणीच्या (Damselfly) दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे. छायासुंदरी (Shadow Damsel) गटातील या दोन्ही प्रजाती असून ‘खासीची छायासुंदरी’ आणि ‘युनानोस्टिक्टा सियांगी’ अशी त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत. डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या नेतृत्त्वाखाली शंतनू जोशी, डॉ. दत्तप्रसाद सावंत, उज्वला पवार आणि विवेक सरकार या संशोधकांच्या चमूने हा शोध लावला आहे. झूटॅक्सा या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून हा संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.


damselfly
भारताचा ईशान्य भाग हा सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखला जातो. याच प्रदेशातील मेघालय आणि अरूणाचल प्रदेश या राज्यांमधून शोधलेल्या छायासुंदरी (Shadow Damsel) गटातील या प्रजाती असून त्यांच्या लांब आकार आणि अंधाऱ्या ठिकाणी वास्तव्य करण्याच्या सवयीसाठी ओळखल्या जातात. नव्याने शोधण्यात आलेल्या टाचणीच्या एका प्रजातीचे शास्त्रीय नाव प्रोटोस्टिक्टा खासीया असे असून मेघालयातील पुर्व खासीच्या टेकड्यांमध्ये ही प्रजात आढळली आहे. ‘खासीची छायासुंदरी’ असे तिचे नामकरण करण्यात आले असून भारतीय वन्यजीव संस्थानच्या विवेक सरकार यांना २०१७ साली सोहरा (आधीचे चेरापुंजी) येथे गडद करड्या रंगाची प्रोटोस्टिक्टा चाचणी आढळली होती. भारतातील आघाडीचे किटकसंशोधक शंतनू जोशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही टाचणी पुर्णपणे वेगळी असल्याचे समोर आले. आकारशास्त्र, जननेंद्रीयांचा आकार आणि पकडीसारखी रचना असलेली तसेच पोटाच्या टोकाकडची उपांगे यावरून ‘खासीची छायासुंदरी’ ही नवी प्रजात असल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

तर, डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या नेतृत्त्वाखाली अरुणाचल प्रदेशमधील अप्पर सियांग जिल्ह्यामध्ये शोध मोहिम राबवत असताना शंतनू जोशी आणि उज्वला पवार यांना पोटाच्या टोकाकडील भागामध्ये निळे ठिपके असलेली टाचणी आढळली. या टाचणीचे फोटो भारतातील कुठल्याही टाचणीशी जूळत नसल्यामूळे हे फोटो डॉ. दत्तप्रसाद सावंत यांना पाठवले. जगातील शंभरहून अधिक टाचण्यांवर अभ्यास केल्यानंतर त्यांनी ही टाचणी अतिशय दुर्मिळ असून युनानोस्टिक्टा या प्रकारात येते असा अंदाज वर्तविला. नेदरलॅण्डसचे ख्यातनाम किटकशास्त्रज्ञ रॉरी डोव यांनीही ही टाचणी युनानोस्टिक्टा प्रकारात असल्याचा दुजोरा दिल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. अप्पर सियांग जिल्ह्यात आढळल्यामूळे या टाचणीचे युनानोस्टिक्टा सियांगी असे शास्त्रीय नाव तर सियांग छायासुंदरी असे सामान्य नाव ठेवण्यात आले. या प्रजातीचे वर्णन संशोधन अहवालामध्ये समाविष्ट केल्यामूळे भारतामध्ये एका नव्या प्रजातीबरोबर नवीन कुळाचाही समावेश करण्यात आला आहे.