‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ जाणार दुबईला; करणार LIVE सादरीकरण

    17-May-2024
Total Views |
लोकप्रिय मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम पोहोचला दुबईत
 
hasyajatra 
 
मुंबई : सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम अल्पावधीत फार लोकप्रिय झाला. महाराष्ट्रच नाही तर जगभरातील प्रेक्षक या कार्यक्रमाचे चाहते झाले. आत्तापर्यंत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर दौरा केला आहे. आता पुन्हा एकदा हे विनोदाचे हास्यवीर परदेशातील प्रेक्षकांना खळखळून हसवायला जाणार आहेत. यावेळी ही स्वारी दुबईला जाणार आहे. जून महिन्यात दुबईमध्ये या कार्यक्रमाचे शो पार पडणार असून लेखक अभिनेते समीर चौघुले यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
 
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचा दुबई दौरा २ जून २०२४ पासून सुरु होणार आहे. शेख राशिद थिएटरमध्ये याचा पहिला शो संपन्न होणार असून समीर चौघुले लिहितात, “नमस्कार! आम्ही हास्यजत्रेचा लाइव्हचा दुसरा सीझन सुरू करत आहोत. आमच्या संपूर्ण टीमबरोबर दुबईमध्ये अनिकेत आमटे आणि अमित फाळके उपस्थित असतील. आम्ही सगळे कलाकार लाइव्ह सादरीकरण करणार आहोत…या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा दौरा यशस्वी करा.”
 
 hasyajatra 
 
दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, इशा डे, प्रभाकर मोरे, चेतना भट, नम्रता संभेराव, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत हे कलाकार दुबई दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी पृथ्वीक, निखिल बने, शिवाली यांसारखे कलाकार दुबईला येणार नाहीत का? असे प्रश्न समीर चौघुलेंना विचारले असून आता दुबईला कोण-कोण जाणार आणि हे कलाकार तेथील प्रेक्षकांना खळखळून हसवून आणखी काय काय धमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.