दामोदर नाट्यगृह चळवळ तीव्र, दामलेंनी दिला उपोषणाचा इशारा

    16-May-2024
Total Views |
Proud to be Labelled as the Comedy Actor : Prashant Damle - PUNE PULSE 
 
मुंबई : मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी अभिनेते-निर्माते यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे.
 
सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणाने बंद आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे. याविरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे. नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे अशी मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाचे पडसाद उमटले. त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले आहे.
 
प्रशांत दामले यांनी सांगितले, ‘हा विषय सामोपचाराने सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे न होता स्थगितीला न जुमानता तोडकाम सुरू झाले आहे. याविरोधात सोशल सर्व्हिस लीगला पत्र लिहिले जाणार आहे. जर त्यांनी ऐकले नाही तर नाटय़गृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार."