कौटुंबिक उद्योगांचा वाढता प्रभाव!

    16-May-2024
Total Views |
family business

अभ्यासक हरिष मढीवाला व तत्वमसी दिक्षित यांनी आपल्या अभ्यासात प्रामुख्याने नमूद केल्यानुसार, सद्यस्थितीत एकूण उद्योग-व्यवसायांपैकी सुमारे ८५ टक्के उद्योग व मूलतः कौटुंबिक उद्योग वा कौटुंबिक व्यवसाय स्वरुपाचे असून, सध्या देशाच्या एकूण घरगुती उत्पादन म्हणजेच राष्ट्रीय जीडीपीच्या ६० टक्के ऐवढे योगदान या कौटुंबिक व्यवसायांद्वारे प्राप्त होत आहे. हा तपशील व आकडेवारी आर्थिक व्यवसायाच्या संदर्भात अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरते.
 
भारतातील व्यक्तिगत स्तरावरील वा कौटुंबिक स्वरुपाचे उद्योग-व्यवसाय म्हणजे परंपरागत स्वरुपात भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. सुप्रसिद्ध अर्थशास्त्री व व्यवसायतज्ज्ञ हरिष मढीवाला व ‘फॅमिली बिझनेस : मेकओव्हर्स अ‍ॅण्ड टेकओव्हर्स’चे अध्यक्ष तत्वमसी दिक्षित यांनी भारतातील कौटुंबिक उद्योगांचे मूळ, त्यांच्यापुढील आव्हाने व या परंपरागत उद्योगांच्या यशोगाथा या अभ्यासात भारतातील कौटुंबिक व्यवस्थापन-व्यवसायपद्धतींचा जो अभ्यास केला आहे तो, अनेकार्थांनी मार्गदर्शक ठरतो.अभ्यासक हरिष मढीवाला व तत्वमसी दिक्षित यांनी आपल्या अभ्यासात प्रामुख्याने नमूद केल्यानुसार, सद्यस्थितीत एकूण उद्योग-व्यवसायांपैकी सुमारे ८५ टक्के उद्योग व मूलतः कौटुंबिक उद्योग वा कौटुंबिक व्यवसाय स्वरुपाचे असून, सध्या देशाच्या एकूण घरगुती उत्पादन म्हणजेच राष्ट्रीय जीडीपीच्या ६० टक्के ऐवढे योगदान या कौटुंबिक व्यवसायांद्वारे प्राप्त होत आहे. हा तपशील व आकडेवारी आर्थिक व्यवसायाच्या संदर्भात अनेकार्थांनी महत्त्वपूर्ण ठरते.
 
अभ्यासात सुरुवातीलाच नमूद केल्यानुसार, भारतातील कौटुंबिक उद्योग व त्याच्या व्यवस्थापनाच्या संदर्भात, ज्या बाबी प्रामुख्याने मांडल्या आहेत, त्यानुसार या उद्योगांची पिढीजात व परंपरागत स्वरुपात आपले उत्पादन, प्रक्रिया, सेवा इत्यादींच्या गुणात्मक वाढीवर भर दिला आहे. या उद्योगांचे व्यावसायिक नियोजन हे साधारणतः वस्तुनिष्ठ व माफक अपेक्षांसह केले जाते. परिणामी, भारतातील कौटुंबिक स्वरुपातील उद्योगांना कायमस्वरुपी स्थैर्य व आर्थिक पाठबळ लाभते.या उद्योगांमध्ये विशेषतः महत्त्वाच्या व व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण पदांवर संबंधित उद्योगात तुलनेने प्रदीर्घ काळापर्यंत काम करणार्‍यांना प्राधान्याने नेमले जाते. परिणामी, व्यवसायाचे मालक-संचालक व असे निवडक पण महत्त्वपूर्ण कर्मचारी यांच्यामध्ये केवळ समन्वयच नव्हे, तर व्यावसायिक सामंजस्य प्रकर्षाने दिसते. असे कर्मचारी व त्यांचे कामातील योगदान या उद्योगांसाठी जमेची बाजू ठरते.
 
अशा उद्योगांमध्ये प्रशासनिक पदाधिकारांबाबत लवचिकता असते. ही लवचिकता संबंधित उद्योग-व्यवसायाशी निगडित व प्रदीर्घ काळापर्यंत पडताळलेली असते. त्यामुळे प्रसंगी माफक वा मर्यादित कर्मचार्‍यांसह काम करण्याची कामाची पद्धत सर्व स्तरांवर अमलात आणली जाते. यातून प्रत्येकाच्या काम आणि जबाबदारीची निश्चिती होऊन ही बाब व्यावसायिक उलाढाल व वाढ या दोन्ही मुद्द्यांना पूरक ठरते.इतर उद्योग-व्यवसायांप्रमाणेच कौटुंबिक उद्योगांमध्ये फायद्याची अपेक्षा असते. मात्र, यापैकी बहुतांश उद्योजक वा व्यवसायिक फायद्यालाच सर्वोपरी मानतात, असे नाही. उलट, आपल्या उद्योग-व्यवसायाला गती मिळून त्यामध्ये वाढ व्हावी व परिणामी फायदा मिळावा, यासाठी ते आग्रही असतात. यामध्येसुद्धा व्यवसायातून होणारा फायदा मर्यादित संख्येतील व मुख्य म्हणजे, घरच्या सदस्यांमध्येच विभागला जाणार असल्याने व्यवसायातील आर्थिक व्यवहारांपासून व्यावसायिक फायद्याच्या विभागणी-वाटपामध्येतुलनेने मर्यादित स्पर्धा दिसून येते.
 
अर्थात, कौटुंबिक व्यवसायाला खर्‍या अर्थाने यशस्वी करण्यासाठी वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक स्तरांवर काही बाबींची विशेष काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रामुख्याने पुढील मुद्द्यांचा समावेश करावा लागतो.व्यावसायिक संदर्भात व निर्णय प्रक्रियेत सहभागी असणार्‍यांमध्ये प्रसंगी व्यवसायाच्या संदर्भात सिद्धांतिक मतभेद असू शकतात. मात्र, त्यांच्यामध्ये अनावश्यक व अतिरेकी स्वरुपाची स्पर्धा असू नये. व्यावसायिक उद्दिष्ट, प्राधान्यक्रम व प्रमुख धोरणात्मक निर्णयांबद्दल सर्वांना पुरेशी माहिती असावी. अशी माहिती सर्व संबंधितांना वेळेत व पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास त्याचे विपरित परिणाम संपूर्ण व्यवसायप्रक्रियेवर होऊ शकतात, हे नेहमीच लक्षात ठेवायला हवे.अशा व्यवसाय-व्यवस्थापनाला गतिमान व कृतिशील ठेवण्यासाठी कुटुंबातील निवडक व्यक्ती व संबंधित विषयातील विषयतज्ज्ञ यांची नेहमीच सांगड घालावी लागते. त्यातून कुटुंबातील बाहेरच्यांना त्यांचे ज्ञान, अनुभव इ. लक्षात घेता व्यवस्थापन रचनेत घ्यावे लागते. हे करताना ‘घरचे’ व ‘बाहेरचे’ यांचा समन्वयच नव्हे, तर ताळमेळ साधायला हवा. हे काम मोठे आव्हानात्मक असते व ते करणे आवश्यक असते.

वरीलप्रमाणे सांगड घालताना व्यावसायिक व्यवस्थापनाने विशेषतः महत्त्वाच्या व जबाबदारीसह काम करण्यासाठी संबंधितांच्या कामाचे स्वरुप, त्यांच्या जबाबदारीच्या कक्षा, निर्णयप्रक्रिया, परस्पर संवादप्रक्रिया, संबंधितांचे व्यवस्थापक म्हणून अधिकार व मुख्य म्हणजे त्याअनुषंगाने असणारी जबाबदारी इत्यादींची कल्पना स्पष्ट केलेली असावी.वर नमूद केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी कुठलाही मुद्दा जर पुरेशी काळजी न घेता व स्पष्टतेसह हाताळला नाही, तर त्याचे मोठे व दूरगामी स्वरुपाचे परिणामदेखील होतात. कौटुंबिक व्यवस्थापनाची रचना ही कमी संख्येतील, लवचिकता व जबाबदारीसह काम करण्यावर भर देणारी असल्याने यासंदर्भात सर्वार्थाने काळजी घेणे, ही संबंधित व्यवसायप्रमुखाची मोठी जबाबदारी ठरते. यासाठी, कुटुंबातील जी व्यक्ती वा काही निवडक व्यक्ती व्यवसायाचे संचालन-नियोजन करत असतील, अशांनी कुटुंबातील सर्व संबंधित व प्रमुख घटकांमध्ये व्यावसायिक सौहार्द असावे, त्या सर्वांचे विचार व कृती यांच्यात एकजिनसीपणा असावा, संपूर्ण व्यवस्थापन चमूचे उद्दिष्ट व्यवसायवाढीवर केंद्रित असावे, व्यवसायावर कौटुंंबिक मालकी व हक्क यांना प्रगतीशील व्यवस्थापनाची जोड असावी व मुख्य म्हणजे व्यावसायिक संदर्भात वैयक्तिक आशा-आकांक्षा व व्यावसायिक अपेक्षा आणि आवश्यकता यांवर समान स्वरुपात भर दिला जावा.

अर्थात, यासाठी सातत्याने प्रयत्न, शास्त्रोक्त व दीर्घकालीन नियोजन नेतृत्वपद्धती व त्याचा विकास, संघभावना व एकत्रित काम करण्याची पद्धती, व्यवसायविस्तार, व्यवसाय प्रक्रिया व तंत्रज्ञानाचा विकास, कामकाजातील अद्ययावतपणा असण्यावरच कौटुंबिक उद्योगांचे यश व कायमस्वरुपी विकास अवलंबून असतो.भारतातील कौटुंबिक व्यवसाय व त्याच्या सुमारे शतकाहून अधिक यशस्वी कारकिर्दीने जागतिक स्तरावरील व प्रसंगी बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपापल्या यशोगाथासह व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे दिले आहेत. यात कुटुंबातील व्यवस्थापन व व्यवस्थापकीय नेतृत्व, विशेष व्यावसायिक मूल्ये, सहकार्यासह काम करण्याची पद्धत, विशेष व लवचिक कार्यसंस्कृती, मतभेद निवारण पद्धती, परस्पर संबंध व विश्वास, शिस्त व अनौपचारिक संवादाचे मिश्रण, घरचा व्यवसाय असल्याने आर्थिक व्यवहारातील काटकसर, व्यवहारखर्चावर नियंत्रण, प्रचलित वा संभाव्य जोखमीचे आकलन व अभ्यास करून त्यावरील उपायांची तयारी, मानवीय संबंधातील जिव्हाळा, व्यवसाय व्यवस्थापनाप्रती समर्पण भावना, व्यवसायांतर्गत उद्यमितेसह उपक्रमशीलता, कौटुंबिक उद्योगातसुद्धा नव्या कर्मचार्‍यांच्या आशा-आकाक्षांची जपणूक करणे इत्यादींचा प्रामुख्याने समावेश असून, वरील तत्त्वांसह यशस्वीपणे काम करणार्‍या भारतातील कौटुंबिक उद्योगांच्या यशोगाथांचा अभ्यास विकसित देशातील उद्योगव्यवस्थापन क्षेत्रात होत आहे.दरम्यान, हरिष मढीवाला व तत्वमसी दिक्षित यांनी भारतातील कौटुंबिक उद्योगांची वाढती वाढ व विकास लक्षात घेता, नजीकच्या काळात या उद्योगक्षेत्राने उद्योगाची वाढ पुढच्या पिढीत केवळ कायमच न राखता, व्यावसायिक विकासासाठी नव्या व्यवस्थापकांसह व्यवस्थापनपद्धतीचा विकास तातडीने करण्याची महत्त्वपूर्ण सूचना केली आहे.


दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर - व्यवस्थापन सल्लागार आहेत.)