मुंबई-गोवा महामार्ग जून अखेरीस पूर्ण होणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मांडला कोकणच्या विकासाचा रोडमॅप

    16-May-2024
Total Views |

mumbai goa highway


मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी 
"चिपळूणचा उड्डाणपूल सोडून मुंबई-गोवा महामार्गाचे संपूर्ण काम हे जून महिना अखेरीपर्यंत पूर्ण होणार", असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात जयहिंद नगर, खार रोड येथील महायुतीचे उमेदवार उज्वल निकम याच्या प्रचारार्थ गुरुवार, दि.१६ मे रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यासोबतच भारतीय जनता पक्षाचे मुंबईसह कोकणच्या विकासाचे व्हिजनही गडकरी यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी गडकरी म्हणाले, " मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईतून गोव्याला पाच तासात जाणे शक्य होणार आहे. कोकणातील नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही बीपीटीमधून रोरो सेवा सुरु केली आहे. यामुळे तुम्ही तुमची वाहने थेट रोरोद्वारे अलिबागला घेऊन जाऊ शकता. अलिबागहून मुंबई-गोवा महामार्गाला तुम्ही जोडले जाता. मुंबईतुन अलिबाग जो प्रवास रस्ते मार्गे साडेतीन तासांचा आहे तो रोरोमुळे ४५ मिनिटात होतो. यामुळे कोकणातुन मुंबईत व्यवसायसाठी येणाऱ्यांचा प्रवास सोपा झाला आहे. गोव्याला लागून असणाऱ्या महाराष्ट्राच्या सीमाभागाचा झपाट्याने विकास होतो आहे. पर्यटन आणि मासेमारी व्यवसायांच्या विकासातून आमचा कोकण समृद्ध आणि संपन्न होतो आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून देशाला समृद्ध करण्याचे आमचे व्हिजन आहे", अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

पुढे ते म्हणाले,"विरार ते दिल्ली महामार्गाचे काम आम्ही एनएचआयच्या माध्यमातून करणार आहोत. हा हायवे थेट जेएनपीटी पर्यंत जाणार आहे. याचा फायदा असा होणार आहे की, पुन्हा एकदा वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन या चार गोष्टी ज्याठिकाणी येतात त्याठिकाणी उद्योग आणि व्यापार वाढतो. तरुणांना रोजगार निर्माण होतो. त्याभागातील गरिबी दूर होते. मोदीजींच्या सरकराने याला प्राथमिकता दिली आहे. आपल्याकडे बंदरांचा विकास झाला आहे. यामुळे भारताची निर्यात क्षमता वाढली आहे. पूर्वी आपल्या मच्छिमारांच्या बोटी समुद्रात केवळ १० नॉटिकल मैलपर्यंत जातात. आम्ही १०० नॉटिकल मैल जाईल अशा एका नवीन बोटीचे संशोधन केले. तामिळनाडूचे मच्छिमार हे श्रीलंकेच्या सीमेवर जायचे तिथे त्यांना १०० बोटी दिल्या आहे. आता आपण फिश प्रोड्युसर कंपन्या नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्याच्यामार्फत आपली बोट ज्यावर बर्फ भरण्यापासून, स्टोअरेज पर्यंत सर्व सुविधा आहे अशी १०० नॉटिकल मैल जाणारी बोट आपण वापरल्यास माशांचे उत्पादन वाढेल. यामुळे कोकणातील मच्छिमार समृद्ध होईल.

"इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या लक्षणीय वाढते आहे. यामुळे प्रदूषण तर कमी झालेच पण इलेक्ट्रिक व्हेईकल लोकप्रिय झाले आहे. माझ्याच हाताने मुंबईतील डबल डेकर बसचे उदघाटन झाले होते. लवकरच पेट्रोल डिझेलवर चालणारी वाहने आणि इव्ही यांची किंमत सामान होईल. पाच वर्षाच्या आत मुंबईत सर्व इलेक्ट्रिक बस येणार आहेत. देशात होत असलेलं परिवर्तन हे विकासाचे आणि गोरगरिबांच्या हिताचे आहे," असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधी पक्ष नागरिकांची दिशाभूल करतोय

विरोधी पक्ष नागरिकांची दिशाभूल करत आहे. कोणताही पक्ष सत्तेत आला किंवा कितीही संख्याबळ असेल तरी संविधानाची मूलभूत तत्व बदलता येणार नाही असा निर्णय आहे. मात्र संविधानाच्या भाग २मध्ये बदल करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी संविधानाची मोडतोड केली. भाजपने सरकार येताच हे कलम रद्द केले. यामुळे मी विश्वास देतो की संविधान कोणीही बदलणार नाही. महायुतीचे उमेदवार उज्वल निकम तेच आहेत ज्यांनी मुंबईत दहशतवादी हल्ला करणाऱ्या, निरपराध बळी घेणाऱ्या कसाबला फाशीवर चढवलं आहे. मला विश्वास आहे की ते आपल्या सर्व मागण्या आणि आकांक्षा पूर्ण करतील, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.