घाटकोपर दुर्घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण

शेवटच्या दिवशी आणखी २ मृतदेह ताब्यात

    16-May-2024
Total Views |

ghatkopar


मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी 
घाटकोपरमधील छेडा नगरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सुरू असणारे बचाव कार्य आता पूर्ण झाले आहे, तर फलकाचे सुटे भाग व राडारोडा हटवण्याचे कार्यही पूर्णत्वाकडे आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली आहे. या दुर्घटनेत गुरुवार दि.१६ रोजी राडारोडा हटविताना आणखी दोन मृतदेह हाती लागले आहे.

घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटना स्थळी बचाव कार्यासाठी विविध शासकीय व बाह्य यंत्रणांचा समावेश होता. सर्व यंत्रणांनी आपसात योग्य समन्वय राखून बचाव कार्य पूर्ण केले. घटनास्थळी अन्य कोणतीही व्यक्ती अडकली नसल्याची तपासणी करण्यात आली असून या पाहणीअंती बचाव कार्य पूर्ण झाले आहे. जाहिरात फलक कापून केलेले सुटे भाग तसेच इतर राडारोडा (डेब्रीज) इत्यादी हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम देखील आता पूर्णत्वाकडे असून आज दिवसभर देखील सुरु राहणार आहे. सर्व आवश्यक कार्यवाही करुन घटनास्थळ पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टिने निर्देश देण्यात आले असल्याची माहिती आयुक्तांनी पाहणी दौऱ्यानंतर दिली. बुधवारी रात्री उशिरा या दुर्घटनेच्या ढिगाऱ्यातून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दोन मृतदेहांची नावे मनोज चांसोरिया (६०) आणि त्यांची पत्नी अनिता चांसोरिया (५९) अशी आहेत. या घटनेतील मृतांची संख्या आता १६ झाली आहे.
पेट्रोल पंपाच्या परवानगीची देखील तपासणी

मुंबई महानगरात कोणत्याही व्यवसायासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोलपंपच्या बांधकामासाठी देखील प्रोव्हिजिनल (तत्वतः) परवाना देण्यात आला होता. पेट्रोलपंप चालवण्याचा विहित परवाना संबंधितांनी प्राप्त केलेला होता की नाही, इत्यादी बाबतची महानगरपालिका प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार परवाना नसल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त गगराणी यांनी अखेरीस नमूद केले.

जाहिरात फलक (होर्डिंग) मानकांचे पालन करा

बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेल्वे प्रशासनालाही त्यांच्या हद्दीतील जाहिरात फलकांच्या संरचनात्मक स्थिरता पडताळणीसाठी निर्देश दिले आहेत. रेल्वे प्रशासनच नव्हे तर अन्य कोणत्याही जागेत जाहिरात फलकांसाठी लागू असलेल्या मानकांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. संरचनात्मक स्थिरता तपासणी व पडताळणी करुन सर्व संबंधितांनी महानगरपालिकेला प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, असेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्टपणे सांगितले.

व्हीजेटीआय देणार तपासणी अहवाल

या दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्यांनी संरचना स्थिरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले होते, त्यांच्याकडून महानगरपालिकेने स्पष्टीकरण मागवले आहे. त्याच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. दरम्यान, छेडा नगर मधील जाहिरात फलकाविषयीचा तांत्रिक तपासणी अहवाल हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांचेकडून सादर करण्यात येणार आहे. पाया बांधकाम किंवा संरचनात्मक स्थिरतेचा नेमका काही विषय आहे का? याबाबतचा यथायोग्य अहवाल या तज्ज्ञ संस्थेकडून सादर करण्यात येईल. त्यासाठी व्हीजेटीआय पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासणी सुरू केली आहे.