मुंबईत डोंगर उतारावरील झाडांची छाटणी सुरू

कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून पालिकेकडून उपाययोजना

    16-May-2024
Total Views |

BMC


मुंबई, दि.१६: प्रतिनिधी 
पावसाळापूर्व खबरदारी म्हणून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे बीएमसीच्या माध्यमातून हाती घेतली आहेत. यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षणअंती जवळपास ४० ठिकाणे निश्चित केली असून, या ठिकाणांवरील ४१४ झाडांची छाटणी करणे आवश्यक आहे. यापैकी ३०५ झाडांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणीदेखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बीएमसी उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने खबरदारी घेत पावसाळापूर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे. नाल्यांतून गाळ उपशासह मुंबईतील धोकेदायक झाडांची तसेच मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर उपनगरीय रेल्वे मार्गालगतच्या झाडांची सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणी देखील करण्यात येत आहे. उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार महानगरपालिका क्षेत्रासह वन विभागाच्या हद्दीतील ४० ठिकाणी मिळून ४१४ धोकादायक झाडे आहेत. उद्यान विभागाच्या पथकांनी या झाडांची छाटणी सुरू केली आहे. दिनांक १३ मे २०२४ पर्यंत ४१४ झाडांपैकी ३०५ झाडांची छाटणी करण्यात आली आहे. उर्वरित झाडांची छाटणी देखील दिनांक ७ जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महानगरात खासगी तसेच शासकीय मालकीच्या परिसरामधील झाडांची छाटणी वेळेत पूर्ण करून घेण्यासंदर्भात आतापर्यंत ८ हजार ५५७ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
झाडांच्या छाटणीसाठी प्रशासनाशी संपर्क साधा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्याच्याकडेची तसेच सार्वजनिक ठिकाणच्या झाडांची छाटणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करावयाची असल्यास संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

- जितेंद्र परदेशी,उद्यान अधीक्षक