ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेची जबाबदारी स्विकारावी! ब्लेमगेम करण्यात अर्थ नाही

    16-May-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली पाहिजे. यात ब्लेमगेम करण्यात अर्थ नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमधील रोड शोवरही टीका केली.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनी घाटकोपरमधील दुर्घटनेची जबाबदारी स्विकारायला हवी. महानगरपालिकेत त्यांची सत्ता असताना ते होर्डिंग उभं राहिलेलं आहे. त्यामुळे यामध्ये ब्लेम गेम करण्यात काहीच अर्थ नाही. त्यावेळी महानगपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार होतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही," असे ते म्हणाले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमधील रोड शोबाबत बोलताना ते म्हणाले की, "कुठल्याही व्यक्तीला प्रचार करण्याचा अधिकार आहे. पण ज्या घाटकोपरला पंतप्रधान मोदी रोड शो करत आहेत तिथे एक घटना घडली आहे. तो पेट्रोल पंप ज्याचा कुणाचा होता आणि ते होर्डिंग लावण्यास ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्यांच्यावर कारवाई होणार की, नाही याबद्दल मोदींनी सांगावं. त्यांनी नुसतं आम्ही कारवाई करु असं शाब्दिक म्हणू नये. त्या बोर्डाचा मालक आणि पेट्रोल पंपाचा मालक यांच्यावर कारवाई होणार की, नाही हे त्यांनी सांगावं," असेही ते म्हणाले.