गुणवत्तापूर्ण बांधकामांसाठी महारेराचा पुढाकार

विकसकाला गुणवत्तापूर्ण बांधकामाची हमी द्यावी लागणार

    16-May-2024
Total Views |

maharera
मुंबई, दि.१६: प्रतिनिधी घर खरेदीदारांना उत्तम गुणवत्तेची घरे मिळावी, राहायला गेल्यानंतर त्यातील त्रुटींसाठी प्रवर्तकाच्या मागे धावायला लागू नये, यासाठी काय करता येईल याबाबत सल्लामसलत पेपर महारेराने डिसेंबरमध्ये जाहीर केला होता. त्या अनुषंगाने आलेल्या सूचनांच्या आधारे महरेराने नवीन परिपत्रक आणि घोषणापत्राचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. याबाबत २३ मे पर्यंत सूचना आणि मते पाठविण्याचे आवाहन महारेराने केले आहे.

स्थावर संपदा क्षेत्रातील बांधकामाची गुणवत्ता हा नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय राहिलेला आहे. ही साशंकता राहू नये यासाठीच अंतिम घोषणापत्र देण्याआधीच्या बाबी काटेकोरपणे अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत. यात संरचना संकल्पन व स्थिरता आणि चांचण्यांमध्ये जेथे प्रकल्प उभा राहणार तेथील संरचना संकल्पन करण्यापूर्वी मातीची चाचणी केली का ? प्रकल्पासाठी संरचना अभियंता नेमला का ? सर्वच कामांच्या गुणवत्ता संनियंत्रणासाठी , प्रकल्प अभियंत्याला वेळोवेळी प्रमाणित करता येईल, अशी नोंदवही प्रकल्पस्थळी ठेवली का ?, सामग्रीची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रकल्पस्थळी चांचणीची सोय आहे का , बहुमजली इमारत असल्यास भूकंपरोधक यंत्रणा आहे का, गरजेनुसार पूरप्रतिबंधक तरतूद आहे का याबाबी प्रामुख्याने पहिल्या जाणार आहे. सल्लामसलत पेपरवर आलेल्या सूचना, मते आणि या क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी बोलून हे सविस्तर परिपत्रक आणि घोषणापत्र तयार करण्यात आलेले आहे.

प्रकल्पाच्या उभारणीत वापरली जाणारी सिमेंट, काँक्रिट, स्टील, इलेक्ट्रीकल वायर, प्लंबिंग आणि मलनिस्सारण फिटींग्ज ही सामग्री बिएस/आयएस/ एनबीस प्रमाणित आहेत ना, बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची चांचणी करून बांधकामयोग्य पाणी वापरले गेले ना या सर्व चांचण्यांच्या नोंदवह्या प्रकल्पस्थळी असायला हव्या. कारागिरीमध्ये प्रकल्पातील विद्युत, पाणी पुरवठा, मलनिस्सारण अशी सर्व महत्त्वपूर्ण कामे नोंदणीकृत अभियंते, कंत्राटदार यांच्या पर्यवेक्षणाखाली झाली ना, भींतीत गळती आणि दमटपणा राहणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली ना याचा तपशील देणे अपेक्षित आहे.

तत्सममध्ये त्रयस्थांमार्फत प्रकल्पस्थळी बांधकामकाळात आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता चाचणी घेतली असेल तर त्याचा तपशील काय, अग्निशमन सुरक्षा, उधईरोधक उपाययोजना केलेल्या आहेत का अशा बाबींचा तपशील प्रमाणित करावा लागणार आहे. या सर्व बाबी प्रकल्प पर्यवेक्षक, अभियंते यांनी प्रमाणित करून दिल्यानंतर प्रवर्तकाला सर्व बाबींची पुन्हा खात्री करुन' गुणवत्ता हमीचे घोषणापत्र' स्वतः प्रमाणित करूनच सादर करावे लागणार आहे. ज्यामुळे विकासकाची जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.