आचारसंहितेच्या नावाखाली मंदिरांतील उत्सव रोखणाऱ्यांना मद्रास उच्च न्यायालयाने सुनावले

    16-May-2024
Total Views |

Madras High Court
(Madras High Court)

मुंबई (प्रतिनिधी) :
केवळ आदर्श आचारसंहितेच्या नावाखाली कुठलेही अधिकारी मंदिरांमध्ये होणारे उत्सव आयोजित करण्याची परवानगी नाकारू शकत नाहीत. असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाच्या निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील भगवान शिव आणि विष्णूच्या मंदिरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या वार्षिक मंदिर उत्सवाची तयारी सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने १८ मे रोजी होणाऱ्या मंदिर उत्सवादरम्यान नियोजित संगीत आणि नृत्य कार्यक्रमास परवानगी देण्यास नकार देणारा पोलिस आदेश रद्द केला होता.

याचिकाकर्ते एस. केशवन यांनी २९ एप्रिल रोजी पोलिसांनी त्यांचा अर्ज फेटाळल्याला आव्हान देणारी याचिका घटनेच्या कलम २२६ अंतर्गत दाखल केली. न्यायमूर्ती के. कुमारेश बाबू यांच्या एकल खंडपीठाने सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीदरम्यान लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा हवाला देऊन अर्ज फेटाळण्याच्या पोलिसांच्या तर्काची दखल घेतली. न्यायालयाने सांगितले की, निवडणुका पूर्ण झाल्या आहेत, संबंधित भागात मतदान पूर्ण झाले आहे. मंदिर उत्सव आयोजित करण्याची परवानगी नाकारण्यामागे अशी कारणे मान्य करता येणार नाहीत.