मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आता बारकाईने लक्ष

कृत्रिम तंत्रज्ञानाने सुसज्ज २१८ सीसीटीव्ही कॅमेरे

    16-May-2024
Total Views |

itps


मुंबई, दि.१६: प्रतिनिधी 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर आधुनिक पद्धतीने लक्ष ठेवण्याचे नियोजन केले आहे. याअंतर्गत एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली बसविण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या माध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ९५ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे महामार्गाच्या प्रत्येक भागाची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच पावसाळ्यातही हवामानाचे अचूक अपडेट्स मिळणार आहेत.

आयटीएमएसचे वैशिष्ट्ये म्हणजे जो वाहनधारक वाहतूक नियमांचे उल्लंघन करेल त्याला थेट ई-चलन पाठवले जाईल. एक्स्प्रेस वेच्या प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावर तसेच टोलनाक्यांवर हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा सुरुळीत वाहतुकीसाठी मोठा उपयोग होईल. या संदर्भात एमएसआरडीसीतील उच्चपदस्थांनी सांगितले की, आयटीएमएस प्रणाली बसवल्यानंतर लेन कटिंग, ओव्हर-स्पीडिंग आणि इतर नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांना सहज ओळखले जाईल. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणे सोपे होत अपघात कमी करणे शक्य होणार आहे. यासह आपत्कालीन परिस्थितीत अपघातस्थळी लवकर पोहोचणेही शक्य होणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे हा राज्यासह देशातील महत्त्वाच्या महामार्गापैकी एक आहे. या मार्गावरुन दररोज सुमारे ६० हजार वाहनांची वर्दळ होत असते. यात सातत्याने वाढ होत आहे. शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी तर या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. हे पाहता महामार्गावर ठिकठिकाणी कृत्रिम तंत्रज्ञानाने सुसज्ज २१८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांचे कामही सोपे होणार आहे. हे अत्याधुनिक कॅमेरा १७ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ओळखण्यास सक्षम आहे. यासह महामार्गावर ११ ठिकाणी हवामान निरीक्षण यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पावसाळ्यात हवामानाचे अचूक अपडेट्स मिळत राहील.