'समृद्धी'च्या विस्तारासाठी बड्या कंपन्यांत मैदानात

तीन मार्गांसाठी तब्बल ४६ निविदा दाखल

    16-May-2024
Total Views |

samrudhi


मुंबई, दि.१५ : प्रतिनिधी 
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विस्तारासाठी नियोजित तीन महामार्गांच्या कामांसाठी मोठ्या आणि नामांकित अशा ४६ बांधकाम कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या कामांसाठी ४६ निविदा सादर झाल्या आहेत. आठवड्याभरातच कमर्शियल निविदा खुली केली जाणार आहेत. तसेच लवकरच या विस्तारित प्रकल्पासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, हा महामार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे.
राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांना थेट मुंबईशी जोडण्यासाठी समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबईपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने निविदा मागवली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत ४६ निविदा दाखल झाल्या असून, एमएसआरडीसीने या महामार्गासाठी तांत्रिक निविदा खुली केली आहेत.


समृद्धी महामार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून हा महामार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला करण्यात येणार आहे. महामार्गावरील इगतपुरी या शेवटच्या टप्प्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. कसारा येथील उड्डाणपुलाचे काम वगळता उर्वरित काम जुलै अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे ऑगस्टपासून शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. कसारा येथील उड्डाणपुलाची एकच बाजू ऑगस्टपर्यंत तर दुसरी बाजू डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. हा मार्ग खुला होताच मुंबई ते नागपूर अंतर आठ तासांत पूर्ण करता येणार आहे.

नागपूर-चंद्रपूर १९४ किलोमीटर

समृद्धीचा तीन महामार्गाच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे. यात नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी २२ निविदा प्राप्त आहेत. नागपूर-चंद्रपूर हा १९४ किलोमीटरचा महामार्ग सहा टप्प्यात तयार केला जाणार आहे. या महामार्गाच्या विविध टप्प्यांसाठी अॅफकॉन इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, माँटेकार्लो, गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, पटेल इन्फ्रा, बीएससीपीएल इन्फ्रा या कंपन्यांनी निविदा सादर केली आहेत.

नागपूर, गोंदिया या १६२ किलोमीटर

समुद्धीच्या विस्तारात नागपूर, गोंदिया या १६२ किलोमीटरच्या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. हा महामार्ग चार टप्प्यात तयार केला जाणार असून, यात अॅफकॉन इन्फ्रा, जी. आर. इन्फ्रा, माँटेकार्लो, एनसीसी, अँपको इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, ओरिएंटल स्ट्रक्चरल इजिनिअरींग अशा कंपन्यांनी निविदा सादर केली आहेत.

भंडारा गडचिरोली १४२ किलोमीटर

समृद्धी महामार्गाला भंडारा गडचिरोलीपर्यंत महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. हा महामार्ग १४२ किलोमीटर इतका लांबीचा आहे. यासाठी गवार कन्स्ट्रक्शन, जी.आर इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, पटेल इन्फ्रा या कंपन्यांनी टेंडर सादर केली आहेत. तांत्रिक निविदामध्ये कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता समृद्धीच्या विस्ताराचे काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराने विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार आहे.