चोराच्या मनात चांदणं! बॅगवरील टीकेवर मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांना टोला

    16-May-2024
Total Views |
 
Shinde & Raut
 
नाशिक : आमचं सगळं लोकांसमोर असतं पण चोराच्या मनात चांदणं, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगमध्ये पैसे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महायूतीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. यावेळी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "चोराच्या मनात चांदणं, चोराच्या उलट्या बोंबा आणि खोदा पहाड निकला चूहा असं राऊतांचं झालं आहे. माझ्या बॅगमध्ये कपडे आहेत. आमचं काहीही बंद नसतं, सगळं लोकांसमोर असतं. पण नाशिक महापालिकेतून कुठे कुठे पैसे गेले आहेत याचाही हिशोब आपल्याला लवकरच मिळेल. संजय राऊतांवर मी बोलत नाही आमचे प्रवक्ते बोलतील," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "खिडीतून मजा बघणारं घरकोंबडं..."; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
 
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या मनगटात दम आहे का? बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच त्यांच्या मनगटातील जोर संपला. दुसऱ्याला गाडण्याची भाषा करण्यासाठी हिंमत लागते. त्यांनी बाळासाहेबांच्या आणि महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला आणि मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ही जनता त्यांना या निवडणूकीत गाडल्याशिवाय राहणार नाही," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "महायूतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची हॅट्रिक करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. फिर एक बार मोदी सरकार असा निर्णय नाशिककरांनी घेतला आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात महायूतीने आणि केंद्रात मोदीजींनी केलेलं काम लोकांसमोर आहे. ५०-६० वर्ष जे काँग्रेसला करता आलं नाही, ते मोदीजींनी २ वर्षांत करुन दाखवलं आहे. त्यामुळे या निवडणूकीमध्ये त्या कामाची पोचवापती मिळेल. आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याने येत्या २० तारखेला हेमंत गोडसे यांची हॅट्रिक पक्की आहे," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.