अफवांना भुलू नका अन् मतदान चुकवू नका!

    15-May-2024
Total Views |
Modi government


लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान राज्यातील 13 मतदारसंघांत सोमवार, दि. 20 मे रोजी पार पडेल. तत्पूर्वी सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून मोदी सरकारविरोधी वातावरणनिर्मितीसाठी अफवांचे पेव फुटले आहे. तेव्हा, सुज्ञ मतदारांनी या अफवांना, खोट्या प्रपोगंडाला आणि नॅरेटिव्हला कदापि बळी न पडता, कोणत्याही परिस्थितीत मतदानाकडे पाठ फिरवू नये. मतदानातूनच राष्ट्राला सर्वोपरी बळकट करणारे सरकार आपण निवडून देणार आहोत, याचे कायम भान ठेवावे.

लोकसभा निवडणुकीतील चार टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले असून, पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवार, दि. 20 मे रोजी पार पडेल. यादरम्यान मोदींनी आजवर केलेल्या कामांची आकडेवारी व देशाच्या सर्वांगीण प्रगतीचे आकडे लोकांसमोर पुराव्यासह वेळोवेळी मांडले गेलेच. साधे उदाहरण द्यायचे झाले, तर महाराष्ट्रातील नुकताच बांधला गेलेला लक्षवेधी अटल सेतू, मुंबई महानगर क्षेत्रात विस्तारणारे मेट्रोचे जाळे, देशात उभारलेले विक्रमी हायवे, रेल्वेमध्ये झालेले आमूलाग्र बदल, एम्स रुग्णालये, आयआयटीपासून ते अशा अनेकविध योजनांची उदाहरणे देता येतील. त्याचबरोबर हुतात्मा सैनिक स्मारक, सीमेवरील विस्तारणारे रस्त्यांचे जाळे, एकूणच सीमेचे सशक्तीकरण, संरक्षण उपकरणांचे उत्पादन, सर्जिकल स्ट्राईक, ‘कलम 370’ हद्दपार करणे व राम मंदिर उभारणी हे राष्ट्रासाठी सर्वस्वी मानबिंदू ठरले. पूर्वी ‘पद्म’ पुरस्कार हे जणू विशिष्ट घराणी व देशातील लब्धप्रतिष्ठितांसाठीच राखीव होते का, असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती होती. मात्र, आता अगदी तळागाळात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असून, त्यात कुठल्याही प्रकारे धर्मभेद राहिलेला नाही.
 
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोदी सरकारमधील एकाही व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. शेअर बाजाराचे महत्त्व जागतिक बाजारपेठेत ‘न भूतो न भविष्यती’ वाढलेले दिसते. याचे कारण म्हणजे, मोदींनी या देशाचा प्रधानसेवक म्हणून अविरत परिश्रमातून विकासाचे सातत्य कायम ठेवले. तसेच मोदी सरकारवर वारंवार केलेल्या आरोपांपैकी एकही आरोप न्यायालयात सिद्ध झालेला नाही. उलट, आरोप करणारेच तोंडघशी पडले असून, त्यांच्यावरच माफी मागायची वेळ आली. म्हणजेच काय तर, विरोधी पक्ष भ्रष्टाचाराचे आरोप करतो, जे न्यायालयात मुळी टिकूच शकत नाहीत. पण, तरीही विरोधक मोदी सरकारची बदनामी करण्यासाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करताना एकटवलेले दिसतात. खोटे मेसेजेस समाजमाध्यमांतून मुद्दाम पसरविले जातात, ज्याला कसलाही सक्षम आधार नसतो, ना कुठल्या गोष्टीची किनार असते.
 
राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे उरलेले कार्यकर्ते, भाजपबाबत ‘मनुवादी कावा’ व ‘ही संविधान वाचवायची लढाई आहे,’ असे भाषणात वारंवार सांगत कंठशोष करताना दिसतात. ते स्वतः तर त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाच्या लढाईत न्यायालयात पराभूत झाले आहेत. त्यांची निशाणी व पक्ष एकनाथ शिंदेंनी हातातून खेचून नेला आहे. त्या कार्यकर्त्यांनी पसरवलेल्या विक्रमी अफवांची, तर गिनीज बुकात नोंद करावी इतके ते खोटे ठरले आहेत. हे कमी की काय म्हणून, देशभरात जे हतबल विरोधक एकत्र आले, त्यांच्या टेम्पोत हे संस्कार विसरून जाऊन बसले.निवडणूक आली की, महाराष्ट्रात अजून एक जोरदार अपप्रचार केला जातो की, मोदी व शाह हे गुजराती असून, त्यांना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी गुजरातला न्यायची आहे. सारासार विचार केला तर हे कुर्ल्याची लोको शेड कर्जतला नेण्याइतके सोपे आहे का? जेव्हा हेच ठाकरे मुंबई महापालिकेत सत्तेत होते, तेव्हा यांनी परप्रांतीय लोकांना रेशनकार्ड दिले नाही का? यांच्या काळात बांगलादेशी घुसखोर मुंबई महानगरात आले नाहीत का? मराठी माणसाचा जो टक्का कमी झाला, तो कुणी कमी केला?
 
विरोधी पक्षाकडे सर्वात महत्त्वाचं सध्याचं हत्यार म्हणजे अफवा पसरवणे व लोकांना घाबरवणे. पण, विरोधकांच्या अफवांना जनतेने बळी पडता कामा नये. यंदाच्या निवडणुकीत काही पांढरपेशी विद्वान मंडळी मतदान करायला गेले नाहीत, हे सर्वस्वी घातक. या सर्व लोकांच्या केंद्रस्थानी नेतृत्व भाजपचे आहे, हे लोक विसरले. ‘पीडीपी’च्या मेहबुबा मुफ्तींना सोबत घेऊन भाजपने ‘कलम 370’ हटवले, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे युतीचा जो उमेदवार आहे, त्याला मतदान करायला हवे. कारण, लक्षात ठेवा की, तुमच्या तत्त्वामुळे येणार्‍या पिढ्यांचे अपरिमित नुकसान झालं तर पश्चात्ताप करण्यासारखं दुसरं काही नसेल.अजून एक महत्त्वाची अफवा जी ‘इंडी’ आघाडीकडून पसरविली जात आहे की, 4 जून नंतर मोदी सरकार सत्तेतून जाणार आहे. असा गुप्तचर विभागाचाच कुठला तरी अहवाल असल्याने व तसा ग्राऊंड रिपोर्ट असल्याने प्रतिनियुक्तीवर असणार्‍या अनेक अधिकारी मंडळींनी त्यांच्या त्यांच्या राज्यात जायचे म्हणे अर्ज केले आहेत. या बातमीला ना काही आधार ना आगा ना पिछा. घरी बसून केवळ सरकारचे 100 खोके दर महिन्याला मोजणार्‍या व्यक्तींचे समर्थकच अशा पुड्या सोडत आहेत. म्हणूनच सामान्यांनी जेव्हा मोदी व मनमोहन सिंग यांच्या तुलनात्मक बातम्या प्रसिद्ध होतात, तेव्हा अशा बातम्या नेमक्या कुठल्या पुराव्याच्या आधारावर व कोणत्या माध्यमांत प्रसारित झाल्या आहेत, त्याची आधी व्यवस्थित शहानिशा करुन घ्यावी. कुठलेही फॉरवर्डेड व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व न्यूज पोर्टलवर काडीचाही विश्वास ठेवू नये.
 
अजून एक महत्त्वाची अफवा म्हणजे, मोदी सरकार सत्तेत आले की आरक्षणाची रचना रद्द केली जाईल. पण, सगळ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, जे आरक्षण कोर्टात वैध ठरते, ते आरक्षण कायद्याने हटू शकत नाही. मोदींनी आरक्षण म्हणून गरिबांना धान्य दिलेले नाही. जे धान्य अडवून व सडवून दारू बनवण्यासाठी मुद्दाम पाठवले जायचे, ते आज गरिबांच्या पोटात जात आहे. देशातील गोदामे उंदरांनी भरलेली होती. ती आज सुरक्षित आहेत. प्रत्येक घरी आज ‘जलजीवन मिशन’चे नळ आणि ग्रामीण भागात शौचालय पोहोचले. जे राहुल गांधी लोकांच्या खात्यात पैसे टाकायचे आश्वासन देत सुटले आहेत, ती खातीसुद्धा काँग्रेस काळात नव्हती. ती खाती बिनापैशांंत मोदी सरकारच्या काळातच उघडली गेली, हे वास्तव.नुकतेच पुण्यातून एका इस्लामिक संस्थेने जाहीरपणे ‘इंडी’ आघाडीला त्यांच्या धर्माच्या व्यक्तींना बोलवून पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याकूब मेमन मेमोरियल बांधण्याचे ज्यांनी स्वागत केले, त्या व्यक्तींना हा पाठिंबा साहजिकच आहे. पण, हेही लक्षात घेऊन काही लोक अफवांना भुलले आणि राष्ट्रवादीला सोबत घेतले म्हणून निषेधाने मतदान करायला गेले नाही तर, त्यांना पुढच्या पिढ्या माफ करू शकत नाहीत, याचे भान असायला हवे.
 
नुकतेच शरद पवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना चिडले. ते म्हणाले की, “हा छोट्या कुटुंबातला व छोट्या समाजाचा मुलगा. त्याला आम्ही जी मदत केली, त्याची जाण राहिली नाही.” म्हणजे शरद पवारांना असे म्हणायचे होते का की, छोटे कुटुंब व छोट्या समाजातील व्यक्ती नेतृत्व करू शकत नाहीत?अशा या ‘इंडी’ आघाडीने अजून एक चमत्कारिक काम केलं, ते म्हणजे ‘एक्झिट पोल’ वाढवून, चढवून दाखवणे. हे सगळे कुठून होते? अशाच प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये यापूर्वी पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकालही यांच्याच बाजूने दाखवण्यात आले होते. पण, सत्य हेच की, हे पक्ष मात्र त्या निवडणुकांमध्ये पराभूत झाले. त्यामुळे निवडणूकपूर्व मतदान सर्वेक्षणांवर नेमका किती विश्वास ठेवायचा, ते जनतेने आता तरी लक्षात घ्यायला हवं. तसेच सोशल मीडियावर होणारे मतप्रदर्शन म्हणजे सरसकट जनमताचा कौल नव्हे. आता तरी गावातील सामान्य जनताही जागरूकतेने अजून पुढे गेलेली दिसते. कारण, त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजनांचा लाभ पोहोचला आहे.
 
जागरूक नागरिकांचे आणखीन एक चुकते. हे नागरिक मतदानाला न जाता देशातील सिस्टीमला शिव्या देण्यात अधिक धन्यता मानताना दिसतात. त्यांनी सिस्टीमविषयी नक्की बोलावं, पण हे करताना आधी मतदानाला घराबाहेर पडावं. देशात गेल्या दहा वर्षांत सर्वांगीण बदल घडलेला आहे. त्याचे साक्षीदार व्हावं व भारताला पुढील 100 वर्षे सशक्तकरण्याकरिता आपण मोदींना मतदान करून राष्ट्रविकासार्थ योगदान द्यावं. युतीच्या कार्यकर्त्यांनी अफवा पसरविणारे मेसेज दिसले की, त्याची तत्काळ माहिती निवडणूक आयोगास पुराव्यासह ई-मेल करून द्यावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाऊन कारवाईदेखील केली जाते.देशात मोदींचीच हवा आहे. महाराष्ट्रात तर महायुतीसाठी सकारात्मक वातावरण आहे, ज्याचे प्रत्यंतर मोदींच्या कालच्या ‘रोड शो’मध्येही दिसून आले. ‘इंडी’ आघाडी अफवा पसरवत आहे, त्याचा सर्वांनी कायदेशीर बीमोड करावा. आपण मतदान करावे व दुसर्‍यांना त्यांच्या अफवांचा व फतव्यांचा दाखला द्यावा. सर्वांनी मतदान करूनच 100 कोटी वसुली व जातीयवादी दंगली घडवणार्‍या देशविरोधी शक्तींपासून आपण राज्याचे रक्षण करू शकतो.
 
 
अ‍ॅड. हृषिकेश जोशी

(लेखक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत.)