रे मानवा, सर्वांसाठी शिव हो!

    15-May-2024
Total Views |
Humanity Must Save Nature To Save Itself

माणूस ही ओळख विसरून केवळ मत-पंथांचे ग्रंथप्रामाण्य व बाह्य अवडंबर हेच कारण ठरू लागले. अशामुळे एका माणसाचा दुसर्‍या माणसाशी संवाद संपला. वैरभावना वाढीस लागल्या. परिणामी, आसुरी संघर्षाला प्रारंभ झाला. आज सारे विश्व हे धर्म म्हणजेच पंथ आणि जातीभेदात विभागले गेले आहे. यासाठीच ‘मानुषी प्रजेसाठी शिवो भव’ हा आजच्या काळासाठी अतिशय उपयुक्त असा मोलाचा संदेश!
 
शिवो भव प्रजाभ्यो मानुषीभ्यस्त्वमङ्गिर:।
मां द्यावापृथिवी अभि शोचीर्मान्तरिक्षं मा वनस्पतीन्॥
(यजुर्वेद 11/45)
 
अन्वयार्थ
 
(अङ्गिर:) अरे प्रिय, तेजस्वी व सर्वश्रेष्ठ अशा मानवा, (त्वं) तू (मानुषीभ्य प्रजाभ्य:) मानुषी प्रजेसाठी (शिवो भव) कल्याणकारक मंगलमय हो! (द्यावा- पृथिवी, अन्तरिक्षं च) द्युलोक, पृथ्वीलोक व अंतरिक्षलोक यांना (मा अभि शोची:) सर्व दृष्टीने संतप्त करू नकोस. तसेच (वनस्पतीन् मा) वनस्पतींनादेखील तोडू नकोस.
 
विवेचन

सर्व प्राण्यांमध्ये मानव हाच बुद्धिमान समजला जाणारा समाजशील घटक! इतर प्राण्यांमध्ये फक्त बुद्धीचा अल्पसा संस्कार आहे. त्याच्या माध्यमाने ते फक्त शरीराचे भरण-पोषण करु शकतात. तसेच ते आपल्या अस्तित्वाचे रक्षण करण्यास समर्थ ठरतात. पण, मानवाकडे असलेली बुद्धी ही मात्र स्वतःसोबतच इतरांच्याही कल्याणाचा विचार करणारी असते. केवळ आपल्यापुरतेच मर्यादित न राहता आपल्या परिसरातील प्राणी असो की मानवसमूह, या सर्वांच्या सुखासाठी बुद्धीचा योग्य तो सदुपयोग करणारा माणूस हाच खर्‍या अर्थाने सर्वश्रेष्ठ मानला जातो.वरील मंत्रात अगदीच प्रारंभी ‘शिवो भव’ असा आशीर्वादात्मक आदेश दिला गेला आहे. ‘शिवु कल्याणे’ या धातूपासून बनलेला ‘शिव’ हा शब्द कल्याणवाची अर्थ विशद करतो. जो संपूर्ण विश्वातील चराचरांचे कल्याण साधतो, तो ईश्वर म्हणजेच ‘शिव’ होय. इथे माणसालाच ‘शिव’ होण्याचा उपदेश मिळतो. पण, हे शिवत्व कोणासाठी तर मानुषी प्रजेसाठी!

इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये ‘अहिंसा परमो धर्म:’ या उक्तीनुसार अहिंसा, करुणा, दया व परोपकाराचा भाव असलाच पाहिजे. कारण, ते सर्व जीव मुके व परावलंबी असतात. त्यांना व्यक्त होता येत नाही. म्हणून त्यांच्यावर दयादृष्टी ठेवावी. पण, व्यवहारामध्ये जेव्हा माणसाचा माणसांशी संपर्क येतो, तेव्हा आपल्याच अंतरंगातील काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्षा, द्वेष इत्यादी दुर्भावना उफाळून येतात व या दोषांमुळे तो एकदुसर्‍याचा शत्रू बनू लागतो. शत्रुत्वाची ही भावना इतकी पराकोटीला जाते की बुद्धिमान समजला जाणारा हाच माणूस इतर माणसांशी राक्षसी व्यवहार करू लागतो. स्वार्थापायी जवळचे नातेसंबंधदेखील नाहीसे होतात. चिरकाळापासून टिकलेली घनिष्ठ मैत्रीदेखील संपुष्टात येते.

आजकाल तर आपसातील हेवेदावे, सत्ता व संपत्तीचा स्वार्थ, मानापमान, मानवनिर्मित पंथ व जातीभेद यामुळे माणुसकी संपतेय. पशुता इतकी वाढीला लागली आहे की, माणूस माणसाला ओळखायलादेखील तयार नाही. सतत भांडणे व आपसातील विद्वेषाच्या दुर्भावना यामुळे मनुष्यत्व हद्दपार होत चालले आहे की काय? असे वाटायला लागले आहे. जिकडे पाहावे तिकडे एक माणूस दुसरा माणसाचा हाडवैरी बनून हिंस्र भावनेतून परस्परांना संपवायला निघाला आहे. राजकीय क्षेत्र असो की इतर कोणतेही, सूडभावना इतक्या पराकोटीला पोहोचली आहे की, माणूस नव्हे हा तर पशूच! असे म्हणायची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत ‘शिवो भव प्रजाभ्यो मानुषीभ्यस्त्वमङ्गिर!’ हा वेदमातेचा दिव्य संदेश माणसाला माणुसकीची भाषा शिकवितो.जगातील कोणताही देश असो, तिथे राहणारा माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. त्याने माणुसकीची ही ओळख कदापि विसरता कामा नये.

आजपर्यंत जगात अनेक युद्धे झाली, त्यात वंश, वर्ण, पंथ व जात याच मानवनिर्मित दुर्भावना कारणीभूत ठरल्या आहेत. जगात जाती-धर्माच्या नावांवर विभक्त झालेला तथाकथित माणूस हाच समोरच्या माणसाला माणूस म्हणून ओळखायला तयार नाही. त्याबरोबरच प्रत्येकाचे वेगवेगळे राहणीमान, वेशभूषा, भाषा, खानपान या गोष्टीमुळे माणसामाणसांत उभी फूट पडली. माणूस ही ओळख विसरून केवळ मत-पंथांचे ग्रंथप्रामाण्य व बाह्य अवडंबर हेच कारण ठरू लागले. अशामुळे एका माणसाचा दुसर्‍या माणसाशी संवाद संपला. वैरभावना वाढीस लागल्या. परिणामी, आसुरी संघर्षाला प्रारंभ झाला. आज सारे विश्व हे धर्म म्हणजेच पंथ आणि जातीभेदात विभागले गेले आहे. यासाठीच ‘मानुषी प्रजेसाठी शिवो भव’ हा आजच्या काळासाठी अतिशय उपयुक्त असा मोलाचा संदेश!

आपल्या ऐहिक सुखाची आस पूर्ण करण्यासाठी माणूस कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येत नाही. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करीत द्युलोक, पृथ्वीलोक, अंतरिक्ष आणि वनस्पती या सर्वांना त्रस्त करण्याचे अनिष्ट कर्म माणसाकडून यापूर्वी मोठ्या प्रमाणात घडले व आज तर त्याने फारच मजल मारली आहे. आधुनिक प्रगती, स्वातंत्र्य व स्वैराचाराच्या नावावर निसर्गनियमाचे प्रचंड प्रमाणात उल्लंघन त्याच्याकडून अहर्निश होत आहे. पर्यावरण रक्षणाचा विचार न करता नैसर्गिक तत्त्वांना पायदळी तोडण्याचे कार्य आजचा स्वार्थी माणूस मोठ्या प्रमाणात करत आहे. द्युलोकात असलेले सूर्य, चंद्र, इतर ग्रह, नक्षत्रे यांच्या विरुद्ध आचरण करीत या सर्वांना आपल्या कवेत घेण्याचा मानवाचा दुर्दैवी प्रयत्न म्हणजे आपल्यावर दैवी संकट ओढून घेण्याचा हा अनाठायी उद्योग! सूर्य व चंद्र यांनी कधीही आपल्या नियमात भंग केला नाही. तेजोमय नक्षत्र मंडळ सुव्यवस्थितरित्या गतिमान आहे. असंख्य तारे एका विशिष्ट नियमात सरसावत आहेत. त्याबरोबरच पृथ्वीवरील सागर, नद्या, शेती, डोंगर ही तत्त्वेदेखील अगदी नित्यनेमाने आपल्या कर्तव्यात अग्रेसर आहेत.

विविध वनस्पती मग त्या छोट्या असो की मोठ्या, यांनी आपला कधीही नियम तोडला नाही. पण, आजचा माणूस मात्र स्वतःला भौतिक दृष्टीने सुखात ठेवण्याच्या उद्दिष्टाने या सर्वांना नेस्तनाबूत करत आहे. प्रचंड प्रमाणात वाढत जाणारे कारखाने, उद्योग व व्यापारस्थळे इत्यादींमुळे प्रदूषणाचा भस्मासुर माणसाचे आरोग्य धोक्यात येत असतानासुद्धा कळते पण वळत नाही! या अनिष्ट प्रवृत्तीतून स्वतःबरोबरच संपूर्ण जगालाही बरबादीच्या मार्गावर नेत आहे. अशाप्रसंगी वेदमातेचा ‘मा द्यावापृथिवी..... मा वनस्पतीन्!’ हा उपदेश अतिशय प्रासंगिक ठरतो.सर्व स्तरावरून प्रत्येक घटकांनी या वेदमंत्राचा आशय अंगीकारला तर निश्चितच जगातील प्रत्येक माणूस राक्षस न बनता, शिव बनेल व समग्र विश्वदेखील शिवमय होईल!