‘पृथ्वी’बाबांचे स्वप्नरंजन

    15-May-2024
Total Views |

Pruthviraj Chavan
 
गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काडी; म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधीन माडी...’ ही बा. सी. मर्ढेकर यांची कविता काँग्रेस नेत्यांना विशेषतः पृथ्वीराज चव्हाण यांना तंतोतंत लागू पडणारी. सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची प्रबळ इच्छा असतानाही, केवळ पवारांच्या हट्टापायी मनाला मुरड घालावी लागल्याने पुरते निराश झालेले ’पृथ्वी’बाबा अलीकडे सैरभैर विधाने करताना दिसतात. “एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आमदार, खासदार आणि नेते भाजपसोबत गेले असले, तरी कार्यकर्ते आणि मतदार मूळ पक्षासोबतच आहेत. शरद पवारांना खूप सहानुभूती आहे,” असा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला. पण, सत्य हेच की, मतदान पूर्ण झालेल्या चारही टप्प्यांच्या निवडणूक प्रचारात ते स्वतः उतरले असते, तर असे विधान करण्याचे धाडस त्यांनी मुळीच केले नसते.
 
मोदींच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी हातपाय मारणार्‍या ‘इंडी’ आघाडीत सुरुवातीपासूनच एकोप्याचा अभाव. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचा विचार करता, निवडणुकीच्या घोषणेपासून प्रचार तोफा थंड होईपर्यंत ‘इंडी’ आघाडीतील घटक पक्ष कधीच एकत्र दिसले नाहीत. वास्तविक, भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्यानंतर युती, आघाडीची मोट घट्ट बांधण्यासाठी आपसात सहकार्याची नितांत आवश्यकता असते. ‘इंडी’ आघाडीच्या बाबतीत तसे घडताना दिसत नाही. महत्त्वाच्या जागा पदरात पाडून घेतल्यानंतरही उद्धव ठाकरे मित्रपक्षांना वेळ देत नाहीत, अशी ओरड आजही काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळते. मित्रपक्षांचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात सेनेच्या मतदारांना साद घालण्यासाठी त्यांनी फारशा सभाही घेतल्या नाहीत. याउलट स्वपक्षातील उमेदवारांच्या प्रचारार्थ ते स्वतः आणि मुलगा आदित्य दररोज बाहेर पडतात. दुसरीकडे, बारामतीचे मतदान पार पडेपर्यंत शरद पवारांनी या मतदारसंघाबाहेर पाऊल टाकले नाही. तर, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राज्यभर दौरे करून मतदारांना साद घालू शकेल, असा एकही नेता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आधीच नेतृत्वहीन असलेल्या काँग्रेसची दिशा पूर्णतः भरकटलेली असताना, पृथ्वीबाबांची अशी विधाने मनोरंजनापलीकडे किती गांभीर्याने घ्यायची?
 
मुंबईच्या विकासाचे ‘व्हिजन’
 
निवडणुका म्हटल्या की, आश्वासनांची खैरात, प्रलोभने, पैशांचे वाटप, या आणि अशा आणखी बर्‍याच गोष्टी डोळ्यांपुढे येतात. पण, अलीकडच्या काळात, विशेषतः 2014 नंतर निवडणुकांचा ट्रेण्ड बर्‍यापैकी बदललेला दिसतो. राजकीय पक्षच नव्हेत, आता उमेदवारही स्वतःचा जाहीरनामा काढून, एक ‘व्हिजन’ घेऊन मतदारांना सामोरे जातात. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील बहुतांश उमेदवारांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यात विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी आणि स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीवर भर दिल्याचे दिसते. उत्तर मुंबईपासून सुरुवात केल्यास दहिसर, पोयसर नद्यांचे पुनरुज्जीवन, नद्यांच्या परिसरात होणारे अनधिकृत बांधकाम, वनविभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनींवरील झोपड्यांचा पुनर्विकास, गोराई आणि मनोरीतील वन जमिनी, कांदळवने आणि हरित क्षेत्राचे संरक्षण, असे मुद्दे विशेषतः पीयूष गोयल यांच्या प्रचारात प्राधान्याने दिसतात.आरेमधील झोपडीधारकांचे पुनर्वसन, ’एसआरए’ योजनेंतर्गत बिल्डरांनी अर्धवट सोडलेले प्रकल्प, वाहतूककोंडी, अशा समस्या उत्तर पश्चिम मुंबईत केंद्रस्थानी.
 
मुंबई विमानतळाजवळील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास आणि ’फनेल झोन’ या कळीच्या मुद्द्याला हात घालून उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न, मराठमोळी बाजार केंद्रे, यांसह इतर अनुषंगिक विषयांवर भर दिलेला दिसतो. दक्षिण मुंबईतील दोन्ही मतदारसंघांमध्ये जशी लोकवस्ती संमिश्र, तशाच इथल्या समस्याही निराळ्या. कोळीवाड्यांचे सीमांकन, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, मोडकळीस आलेल्या बीपीटी इमारती, पागडी इमारतींचा रखडलेला पुनर्विकास या आणि अशा कित्येक प्रश्नांवरून इथले नागरिक सातत्याने आवाज उठवत असतात. हिंदमाता परिसरातील ’वॉटर लॉगिंग’ची समस्या सर्वश्रुत आहे. वर्षानुवर्षे कोट्यवधींचा खर्च करूनही त्यावर ठोस उपाय सापडलेला नाही. त्यामुळे हे मुद्दे निकाली निघावेत, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा. एकंदरीत, ही निवडणूक आरोप प्रत्यारोपांपुरती मर्यादित न राहता, मुंबईच्या विकासाभोवती फिरताना दिसते.
 
                                                                                                                                              -  सुहास शेलार