"केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचं खच्चीकरण होतंय!"

    15-May-2024
Total Views |
 
Thackeray & Shinde
 
मुंबई : केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे हळूहळू खच्चीकरण होत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. जैन समाजाचे धर्मगुरू आचार्य प्रवर श्रीमत नयपद्मसागर सुरीश्वर महाराज साहेबजी यांनी आयोजित केलेल्या 'भारत कल आज और कल' या व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण केवळ एका खुर्चीसाठी बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे हळूहळू खच्चीकरण होत आहे. शिवसेना आणि भाजप युतीमध्ये निवडणूक झाली होती. त्यामुळे सरकारही त्यांच्यासोबतच बनायला हवं होतं. परंतू, ज्यांचा बाळासाहेबांनी कायम विरोध केला त्यांच्यासोबत सरकार बनवलं. त्यानंतर आता पापाचा घडा भरला आहे हे लक्षात आल्यावर मी ते सरकार उधळून लावलं," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंगखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती
  
ते पुढे म्हणाले की, "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवले, त्यांच्यासोबतच उबाठा यांनी सरकार स्थापन केले. आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलायला लागली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना आपल्यासोबत प्रचाराला घेऊन फिरत आहेत. 'हिंदू' शब्द म्हणायला त्यांची जीभ कचरू लागली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्ला यांना सोबत घेऊन बसत आहेत," असेही ते म्हणाले.
 
"आम्ही अनेक विकासकामं केली. पण ठाकरेंनी केवळ आपल्या इगोमुळे विकासकामं थांबवली होती. राज्यकर्त्यामध्ये इगो नसावा. आपला अहंकार बाजूला ठेवून जनतेचं भलं कशात आहे हे बघून काम करावं," असे ते म्हणाले. तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.