दिल्लीतील ‘आप’बीती

    15-May-2024
Total Views |
arvind kejriwal

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी, त्यांच्याच स्वीय साहाय्यकाकडून, त्यांच्याच पक्षाच्या एका महिला खासदारासोबत झालेले गैरवर्तन हे सर्वस्वी लज्जास्पद. परंतु, या ‘आप’बीतीविषयी ‘इंडी’ आघाडीतील सर्वपक्षीयांनी अगदी सोयीस्कर मौन बाळगलेले दिसते. त्यामुळे महिला अत्याचाराच्या बाबतीत विरोधकांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
एका धक्कादायक घटनेत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याच आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत केजरीवाल यांच्या स्वीय साहाय्यकाने गैरवर्तन केले. विशेष म्हणजे, स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे पक्षाचे नेते संजय सिंह यांनी मान्यदेखील केले, तर केजरीवाल यांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. केजरीवाल यांनी भेटीसाठी बोलावल्यानंतर, स्वाती मालीवाल या त्यांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करत असताना, बिभव कुमार नावाचा केजरीवाल यांचा स्वीय साहाय्यक तेथे आला आणि त्याने मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केले. स्वाती यांनी पोलिसांना दूरध्वनीवरून झाल्या प्रकाराची माहितीही दिली. ही घटना निंदनीय असल्याचे संजय सिंह यांनी मान्य केले असले, तरी त्यामुळे त्याचे गांभीर्य कमी होत नाही. एका महिला राज्यसभा खासदारासोबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी गैरवर्तन होते आणि घटना घडल्यानंतर ३६ तासांनंतर माध्यमांतून याची वाच्यता झाल्यानंतर, पक्ष केवळ तोंडी आश्वासन देतो, यावरुन दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखाली नेमका कशा पद्धतीचा कारभार होत आहे, याचे हे ज्वलंत उदाहरण!
 
स्वाती मालीवाल या दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. त्यानंतर त्या आम आदमी पार्टीत सक्रिय झाल्या. जो पक्ष मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, तो राज्यात काय देणार, अशा शब्दांत भाजपने कठोर प्रहार केला. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या कारभारावर म्हणूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. राष्ट्रीय महिला आयोगाने याची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले असून, पोलिसांकडून ७२ तासांच्या आत कारवाई अहवाल मागवला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानातून दूरध्वनी आल्याचे पोलिसांनी मान्य केले असून, मालीवाल या पोलीस स्थानकात आल्या होत्या. तथापि, त्यांनी अधिकृत तक्रार दाखल केली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्वाभाविकपणे करण्यात आली. मात्र, ज्या केजरीवालांनी कोट्यवधी रुपयांच्या मद्यधोरण भ्रष्टाचारात तुरुंगात रवानगी झाल्यानंतरही पदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे भाबडेपणाचे ठरेल. आता मालीवाल यांचे माजी पती नवीन जयहिंद यांनी स्वाती मालीवाल यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याबाबत आता काहीही होऊ शकते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. स्वाती यांच्याविरोधात षड्यंत्र रचले जात असून, त्यांच्यासोबत काहीही होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केल्याने, याचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
 
आम आदमी पार्टी काँग्रेसच्या ‘इंडी’ आघाडीची सदस्य असल्याने, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी यासंदर्भात माध्यमांनी संपर्क साधला असता, या दोन्ही नेत्यांनी अवाक्षरही उच्चारले नाही. मुळात आम आदमी पार्टी आणि महिलांशी गैरवर्तन हे समीकरण नवे नाही. २०१४ मध्ये पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांनी देखील महिलांची छेड काढली होती. त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. विशेष म्हणजे, ते त्यावेळी केजरीवाल यांच्या सरकारमध्ये कायदामंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते. अन्य एका घटनेत ते दोषी आढळल्याने, त्यांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. केजरीवाल असोत वा मनीष सिसोदिया, पक्षाच्या प्रत्येक नेत्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आताही केजरीवाल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे. प्रचारासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना २० दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे, तोही काही अटींवर. १ जूनपर्यंत ते जामिनावर बाहेर असतील आणि २ जूनला त्यांना आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
 
दिल्लीतील एका मुख्य सचिवाला केजरीवाल यांनी मारहाण केल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. आता राज्यसभा खासदाराशी गैरवर्तन करण्याचे धाडस केजरीवाल यांच्या स्वीय साहाय्यकाने केले असून, केजरीवालांनी त्याबाबत अवाक्षर उच्चारलेले नाही. केजरीवाल म्हणजे अराजकता, हे गेल्या दहा वर्षांत दिल्लीत घडलेल्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. मणिपूर, हाथरस या प्रकरणांवरून भाजप सरकारविरोधात आगपाखड करणारे विरोधी पक्ष आता मात्र गप्प बसले आहेत. मल्लिकार्जुन खर्गे यांनी तर प्रतिक्रिया देण्यासच नकार दिला. भाजपच्या कार्यकाळात महिला सुरक्षित नाहीत, असा खोटा आरोप करणार्‍या विरोधकांनी साधलेले मौन सर्व काही स्पष्ट करते. काँग्रेस अशा घटनांबाबत काय भाष्य करणार? राधिका खेरा यांचे प्रकरण ताजेच आहे. छत्तीसगढमध्ये राधिका खेरा यांना काँग्रेसी नेत्यांनी चुकीची वागणूक दिली. राधिका यांनी याची माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, सचिन पायलट, पवन खेरा यांनाही दिली. मात्र, त्यांनी कोणतीही मदत केली नाही. राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनीही राधिका यांच्याकडे दुर्लक्षच केले. महिला नेत्यांना पक्षात चांगली वागणूक मिळत नाही, हा आरोप राधिका यांनी केला.
 
केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता याही पक्षात सक्रिय आहेत. त्या तरी स्वाती मालीवाल यांना न्याय देणार का, याचीच प्रतीक्षा आहे. असेही म्हटले जाते की, सुनीता यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यासाठी मालीवाल यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा प्रकार केला गेला, अशी राजधानी दिल्लीत चर्चा आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतरच केजरीवाल यांना अटक झाली. तोपर्यंत दररोज ते माध्यमांशी संवाद साधत होते. मात्र, स्वाती मालीवाल प्रकरणी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राधिका खेरा यांच्या आरोपानुसार, काँग्रेसमध्ये महिला नेत्या सुरक्षित नाहीत. तसे असेल तर महिला अत्याचाराचा विषय राजकारणासाठी कसा सोयीस्कर पद्धतीने काँग्रेसी पक्ष वापरत आहेत, हेच स्पष्ट होते. जे स्वतःच्या पक्षातील महिलांना न्याय देऊ शकत नाहीत, ते देशातील महिलांच्या हितासाठी काय भूमिका घेणार? त्यांना संरक्षण कसे देणार? भाजप एकीकडे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ‘लखपती दीदी’सारख्या योजना राबवत आहे, त्यांना ‘आत्मनिर्भर’ बनवत आहे, तर काँग्रेस, आम आदमी पार्टीसारखे पक्ष सहकारी महिलांशी गैरवर्तन करत आहेत. हे म्हणे देशातील महिलांचे हित साधणार, त्यांना न्याय देणार. केजरीवाल हे अराजकतावादी आहेत, हेच झाल्या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.