"...तरच आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल", सचिन खेडेकरांनी दिला कानमंत्र

    14-May-2024
Total Views |

ssachin  
 
 
मुंबई : मराठी हिंदीच नाही तर अगदी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही मराठी झेंडा रोवणारे अभिनेत सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी आजवर विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यात त्यांनी मराठी भाषेबद्दल आपुलकीने व्यक्त होत लोकांना कानमंत्र देखील दिला होता.
 
व्हिडिओत सचिन खेडेकर म्हणतात की, “तुम्हाला कॉल सेंटरला फोन लावायचा असतो. त्यात इंग्रजी, हिंदी आणि मराठी असे तीन भाषांचे पर्याय असतात. तुम्ही मराठी निवडता. तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाता. तिथेही मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे तीन भाषांचे पर्याय असतात. त्यावेळीही तुम्ही मराठी पर्याय निवडता. तुम्हाला मार्केटींगवाल्यांचा फोन येतो. तुम्हाला त्यांच्यासोबत हिंदी किंवा इंग्रजीतून बोलायला लागते.”
 
पुढे ते म्हणाले की, “त्यावेळी तुम्ही मराठी बोलायचा आग्रह धरा. खरंतर सहसा असे होत नाही. पण व्हायला पाहिजे. कारण हा मराठीचा अतिरेकी अभिमान नाही. हा हजारो लोकांच्या नोकरीचा प्रश्न आहे. मराठीचा आग्रह धरु या. कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी मिळेल. व्यवसाय मिळेल. आपण एक पाऊल पुढे टाकूया. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल!”
सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून लोकं त्यांचं कौतुक देखील करत आहेत.
 
सचिन खेडेकर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शटर’, ‘काकस्पर्श’, ‘हलाहल’, ‘अस्तित्व’, ‘मुरांबा’, ‘नेताजी सुभाष चंद्र बोस’, ‘कच्चा लिंबू’, ‘आजचा दिवस माझा’, ‘नागरिक’, ‘चिमणी पाखरं’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘कायद्याचं बोला’, ‘कोकणस्थ’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत.