मध्यमवर्गीयांच्या जीवनात येईल आनंदाची लाट - पीयूष गोयल

    14-May-2024
Total Views |

PG
 
मुंबई - काँग्रेस सरकारने कायम मध्यमवर्गीयांची पिळवणूक करण्याचे धोरण ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायम निम्न आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारे निर्णय घेतले. पुढील काळातही मोदी सरकार विविध निर्णयांद्वारे या दोन्ही वर्गाला समृद्ध करणारे निर्णय घेतील, असे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
 
बोरीवली (पश्चिम) येथे चंदावरकर रोडवर जैन मंदिर येथून पीयूष गोयल यांच्या नमो यात्रेला सुरूवात झाली. जन आशीर्वाद प्रचार रथासह निघालेल्या या नमो यात्रेला भाजपा आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
काँग्रेसच्या वळचणीला असलेले लोक वारसा कर लागू करण्याची इच्छा व्यक्त करत मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडण्याच्या विचारात आहेत. या उलट मोदी सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गाला कसे सक्षम करता येईल, याच्या प्रयत्नात आहे. घर, आरोग्य, शिक्षण अन्नधान्य याबाबत त्यांनी गेल्या दहा वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. लवकरच आणखी अनेक योजना राबवण्यात येतील, असे पीयूष गोयल नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले. 
 
या प्रचार फेरीत नागरिकांनी जागोजाग पीयूष गोयल यांचे स्वागत करत त्यांना पुष्पहार घातले आणि त्यांच्यावर फुलांची उधळण केली. दहिसर येथील गावदेवी मंदिरात जाऊन पीयूष गोयल यांनी देवीचे दर्शन घेतले. यानंतर एक्सर ग्रामस्थ मंडळातर्फे त्यांचे जोरदार स्वागत करून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळी आमदार मनीषा चौधरी त्यांच्यासोबत होत्या. या नमो यात्रेत खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ॲड. इंद्रपाल सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.